जिल्ह्यात ३३ आधारभूत केंद्र सुरु : ३०४ शेतकरी पोहोचले केंद्रावर, ४९ खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा : साधारणत: १० दिवसांपूर्वी सुरु झालेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ९ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९ खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली असली तरी, केवळ ३३ केंद्र कार्यान्वित झाले असून कमिशन तसेच गोदाम भाड्याच्या थकबाकीचा प्रश्न निकाली निघाला नसल्याने अनेक सहकारी संस्थांनी केंद्र सुरु करण्यास नकार दिला आहे.राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी आदेश निर्गमित करीत १ नोव्हेंबरपासून आधारभूत खरेदी केंद्र सुरु करण्यास सांगितले होते. तथापि, गेल्या काही वर्षातील धान खरेदीचे कमिशन तसेच गोदाम, भाड्यांची रक़्कम देण्यात आली नसल्याने तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था आणि सहकारी भातगिरण्यांनी केंद्र सुरु करण्यास नकार दिला होता. यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बैठक झाली. मात्र, त्यात अपेक्षित तोडगा निघाला नसल्याचे समजते. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अनेक संस्थांनी केंद्र सुरु केले आहेत.भंडारा जिल्ह्यात ४९ खरेदी केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असली तरी आतापर्यंत केवळ ३३ खरेदी केंद्र सुरु झालेत. त्या केंद्रावर २० नोव्हेंबरपर्यंत ९ हजार क्विंटल साधारण (ब ग्रेड) धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत १ कोटी १५ लाख ७ हजार रुपये इतकी आहे. ३०४ शेतकऱ्यांनी हा व्यवहार केला आहे.दरम्यान, खरेदी केंद्रावर जुनाच बारदाणा उपलब्ध असून नवीन बारदाणा अद्याप उपलब्ध करण्यात आला नाही. केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आठवडाभराच्या आत चुकारे अदा करण्यात येतील, असे लोकप्रतिनिधी ठासून सांगत असले तरी, शासनाकडून अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याची माहिती आहे, तथापि, महिनेमहिने चुकारे रखडणार नाहीत, निधीची व्यवस्था होईल, असे सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
केवळ नऊ हजार क्विंटल धान खरेदी
By admin | Published: November 23, 2015 12:42 AM