पांजराबोरी येथील प्रकार : दोनदा धाड पडूनही परिस्थिती जैसे थे, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईमोहाडी : तालुक्यातील पांजराबोरी हे गाव दारुबंदी गाव म्हणून घोषित करण्यात आले. मात्र काही व्यक्ती आजही दारु बनविण्याचा व्यवसाय करीत असून त्यांना स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्यानेच त्यांचा धंदा जोमात सुरु असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भंडारा पोलिसांनी येथे दोनदा धाड टाकली. त्यांचे दारु बनविण्याचे साहित्य नष्ट करून तीन व्यक्तींवर गुन्हा नोंदविला. स्थानिक पोलिसांना या बाबींची माहिती असूनही त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. त्यामुळे दारुचे अवैध धंदे करणारे व स्थानिक पोलिसात साठगाठ असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.पांजरा ते बोरगाव रस्त्यापासून २०० मिटर अंतरावर नाल्याच्या काठावर दारु बनविण्याच्या दोन मोठ्या दारुभट्या आहेत. येथे तयार होणारी मोहफुलाची दारु करडी क्षेत्रातील गावात तसेच भंडारा तालुक्यातील कोका व तिरोडा तालुक्यातील सितेपार येथे पुरवठा केली जाते. दारु काढण्याचे कार्य पहाटे २ ते ३ वाजता सुरु होते. भल्या पहाटे तयार झालेली दारु गावात वितरीत करण्यात येते. ३ जानेवारीला भंडारा गुन्हे शाखेच्या पथकाने पांजरा बोरी येथील दारुभट्टीवर धाड टाकली असता मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १२ जानेवारीला पुन्हा भंडारा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास या हातभट्यांवर धाड टाकली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात मिलींद कोटांगले, अशोक गिरडकर, सूरज शिंदे, प्रदीप गळदे यांच्या चमूने हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहित्य नष्ट केले. तसेच दोन व्यक्तीवर गुन्हे नोंद करण्यात आले. करडी क्षेत्रात पांजरा, देव्हाडा, नरसिंहटोला, मुंढरी या चार गावात हातभट्टीची दारु काढण्याचे कारखाने आहेत. हे अवैध कारखाने नदी काठावरच तयार करण्यात आले आहेत. करडी क्षेत्रातील काही गावे दारुबंदीमुक्त गावे झाले आहेत. मात्र काही दारुभट्टीवाल्यामुळे दारुबंदीची योजना फसण्यााच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक महिलांनी व जागृत नागरिकांनी त्या हातभट्या कायमच्या बंद करण्याची मागणी केलेली आहे.(शहर प्रतिनिधी)धोका होण्याची शक्यतागावठी दारु तयार करण्यासाठी मोहफुलाला सडविण्यात येते. त्याला फास म्हणतात. हा फास लवकर यावा यासाठी त्याच्यात युरिया खत, सदासावलीचा पाला, गुळ, कडूनिंबाचा पाला सोडण्यात येतो. एखादवेळी याचे प्रमाण कमी अधिक झाल्यास ही दारु पिणारा अंध होऊ शकतो किंवा त्याचे प्राणही जाऊ शकते.१ लाख २३ रुपयांचा मुद्देमाल जप्तभंडारा : मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने अवैधरित्या मद्याची निर्मिती, वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी.डी. पटले यांचे नेतृत्वात प्राप्त गुप्त माहितीनुसार पोेलीस स्टेशन अड्याळ हद्दीत मौजा कातुर्ली गावाच्या पूर्वेस नाल्याच्या काठावर छापा घातला. यात सांवत देशपांडे व भाऊराव लोणारे या दोन आरोपींना मोहा दारु गाळतांना अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकी वाहनासह ९७ लिटर मोहादारु, ३ हजार ५८० लिटर मोहसडवासह दारु गाळण्याचे इतर साहित्य जप्त करून त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून १ लाख २३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एन.एन. उईनवार, के.सी. बिरनवारे, एस.डी. लांबट व आर.एम. श्रीरंग यांनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)
मोहाडी तालुक्यात दारुबंदी केवळ कागदोपत्री; ठिकठिकाणी दारूचे गुत्ते
By admin | Published: January 17, 2017 12:19 AM