८४ योजनांचे काम पूर्ण : वीज पुरवठ्याअभावी योजना बंदचगोंदिया : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९० योजना हाती घेतल्या होत्या. यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरिही या योजना निकामी पडून आहेत. वीज नसल्याने या योजना विनकामाच्या ठरत असून यातील फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या योजनांना कधी वीज कनेक्शन मिळणार हे सांगणे आतातरी कठिण आहे. दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये ९० योजना हाती घेतल्या होत्या. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. यात गोंदिया तालुक्यातील १५ योजना असून सर्व योजनांचे काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही मात्र या योजना अद्याप वीज कनेक्शनपासून वंचीत आहेत. योजना असलेल्या ग्राम पंचायतींकडून वीज वितरण कंपनीकडे ए-१ फॉर्म भरून दिला जात आहे. मात्र यात विभागाची दिरंगाई म्हणा की ग्राम पंचायतींकडून होत असलेला उशीर की फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्री कृषी पंपांसाठी पाहिजे तेव्हा वीज कनेक्शन देण्याची गोष्ट करीत आहेत. त्यांचे हे आश्वासन पूर्ण होत नसल्याचे जिल्ह्यात दिसून येते. त्यात पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीतही होत असलेली दिरंगाई चिंतनीय आहे. जलयुक्त शिवार अभियानावर कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. मात्र तयार करण्यात आलेल्या योजना मात्र फक्त वीज कनेक्शनअभावी उभ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
फक्त पाच योजनांचे डिमांड भरले
By admin | Published: July 03, 2015 12:56 AM