यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. तथापि लागवडीखालील धानपिकाच्या खरेदीसाठी शासनाद्वारे किमान समर्थन मूल्य योजनेंतर्गत तालुक्यात १६ आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्या अंतर्गत तालुक्यातील तीन शेतकरी सहकारी संस्थांतर्गत नऊ आधारभूत धान खरेदी केंद्र, तर बेरोजगार संस्थांतर्गत सात अशा एकूण तालुक्यातील १६ आधार धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती.
यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होऊन जवळपास ३ महिने लोटले असताना गत रब्बी हंगामातील शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तब्बल अडीच महिन्यांपासून अदा करण्यात आले नाही. तालुक्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारा पीककर्ज उचलून खरिपातील धान पिकाची लागवड केली आहे. मात्र रब्बी धानाचे चुकारे अदा न करण्यात आल्याने धानपिकावर आवश्यक खते व कीटकनाशक औषधी खरेदीकरिता विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.