तुमसर-तिरोडीदरम्यान ब्रिटिशकालीन रेल्वे ट्रॅक असून या मार्गावर प्रवासी व मालवाहतूक गाड्या धावतात; परंतु कोरोना संक्रमण काळात दीड वर्षापासून प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. तिरोडी ते कटंगी यादरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला. रेल्वे ट्रॅकचे निरीक्षण कोलकाता येथील तज्ज्ञांनी केले होते. सीआरएसने या रेल्वे मार्गाचे निरीक्षण केले. नवीन विद्युतीकरणाचे निरीक्षण संबंधित पथकाने केले आहे. ८ सप्टेंबर रोजी दक्षिण, पूर्व मध्य रेल्वेचे अप्पर रेल्वे व्यवस्थापक ए. के. सूर्यवंशी यांनी निरीक्षण केले. दरम्यान, रेल्वे समितीचे अध्यक्ष प्रभाकर नायडू व रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक सूर्यवंशी यांना या मार्गावर प्रवासी रेल्वे सुरू केव्हा होणार अशी विचारणा केली; परंतु त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे या मार्गावर सध्या तरी प्रवासी रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
बाॅक्स
उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांना फटका
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांतील नागरिकांना यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील नागरिक नागपूर येथे उपचाराकरिता जातात. प्रवासी रेल्वेगाड्या बंदमुळे त्यांना फटका बसला असून बस किंवा खासगी वाहतुकीने त्यांना नागपूर येथे पोहोचावे लागते. नागपूर दुर्ग या रेल्वे मार्गावर केवळ एकच लोकल प्रवासी गाडी धावत असून इतर सर्व गाड्या एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या धावत आहेत. स्पेशल ट्रेन म्हणून या गाड्या धावत असून या गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. केवळ लोकल गाड्यांमधूनच कोरोनाचा प्रसार होतो काय, तर एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्यामधून प्रसार होत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी विचारला आहे.