भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागली असून बुधवारी केवळ सात व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर १०६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नसून सध्या ५४६ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा हाहाकार झाला होता. दररोज १२०० ते १५०० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळत होते. मृत्यूचा आकडाही वाढत होता. मात्र, जून महिन्यापासून कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. मंगळवारी नऊ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. बुधवारी तर केवळ सात जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी तीन व तुमसर तालुक्यात एका व्यक्तीचा समावेश आहे. १८९३ व्यक्तींची तपासणी केल्यानंतर केवळ सातजण आढळून आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी १०६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ५७ हजार ६२७ झाली आहे तर मृतांची संख्या १०४५ आहे. जिल्ह्यात ५४६ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा ७४, मोहाडी ३१, तुमसर २८, पवनी १९, लाखनी ४१, साकोली ३३४ आणि लाखांदूर तालुक्यात १९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
चार तालुके निरंक
जिल्ह्यात शुक्रवारी सात व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या असून चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यात मोहाडी, पवनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्याचा समावेश आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.