जिल्ह्यात पावणेदोन लाख शिधापत्रिकाधारक
भंडारा : राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य रेशन दुकानातून गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे. मका आणि ज्वारी मिळणार अशी माहिती असताना सदर धान्य वाटप करण्यासंदर्भात कुठलीही सूचना किंवा निर्देश पुरवठा विभागाला मिळालेले नाहीत. परिणामी रेशन धारकांना फक्त गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात एकूण दोन लक्ष ६२ हजार ३६६ रेशन कार्ड धारक आहेत. यापैकी पिवळे रेशन कार्ड धारकांची संख्या दोन लाख ३१ हजार अठरा असून केशरी राशन कार्डधारकांची संख्या २६ हजार ५९४ आहे. पांढरे कार्डधारक ४७५४ असून कित्येक महिन्यांपासून सर्वच कार्डधारकांना तुर डाळ मिळत नाही. तसेच साखरेचा पुरवठाही कित्येक महिन्यांपासून झालेला नाही. दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यापासून रेशनकार्डधारकांना मका आणि जोडी मिळणार अशी माहिती उपलब्ध झाली होती मात्र त्यात गहू पुरवठा कमी करून त्याऐवजी मका व ज्वारी देऊ अशी चर्चा होती, मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रेशन दुकानातून फक्त गहू आणि तांदळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. स्वस्त किमतीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरिबांना धान्य वितरित करण्यात येते. मात्र खुल्या बाजारात महागड्या दराने विकल्या जाणाऱ्या डाळीबाबत राज्य शासनाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. दुसरीकडे आता ज्वारी आणि मका देऊ असे सांगितले होते. दिवाळीच्या सत्रात जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या मकाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी मोठी ओरड झाली होती.
बॉक्स
गहू दोन तर तांदूळ ३ रुपये किलो
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय व अन्य शिधापत्रिकाधारकांना युनिटप्रमाणे गहू तांदळाचे वाटप केले जाते.यात गहू दोन रुपये किलो दराने तांदूळ ३ रुपये किलो प्रति दराने देण्यात येते. कार्डात नमूद असलेल्या युनिटप्रमाणे या धान्याचे नियतन व वाटप केले जाते.
बॉक्स
कित्येक महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून डाळीचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यातही आता मका आणि ज्वारी मिळेल, अशी माहिती होती, मात्र आता फक्त तांदूळ व गहू मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वस्त धान्य पुरवठा अंतर्गत सदर धान्य उपलब्ध करून द्यायला हवे होते मात्र तसे झाले नाही.
पंकज साखरे, लाभार्थी.
बॉक्स
रेशनच्या दुकानातून गहू तांदूळ नियमितपणे मिळतो. कोरोना काळातही धान्य मिळाले. मात्र डाळ व अन्य धान्य मिळाले नाही. यापूर्वी साखर, तेल व अन्य धान्य मिळायचे आता फक्त गहू आणि तांदूळ वरच समाधान मानावे लागणार आहे. निकृष्ट दर्जाचा मका चक्क फेकून देण्यात आला होता. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.
अंशुल देव्हारे, लाभार्थी
कोर्ट बॉक्स
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गहू आणि तांदळाचे वाटप करण्याचे निर्देश आहेत. मका आणि ज्वारी वाटप संदर्भात कुठलेही निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. सद्यस्थितीत लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येत आहे.
अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा