संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लॉकडाऊननंतर सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रीवर सर्रास बंदी असताना साकोलीत मात्र ही सुगंधीत तंबाखू खुलेआम बाजारात विकत मिळत आहे. या सुगंधीत तंबाखू विक्री व साठेबाजी प्रकरणात तीनवेळा कारवाई करण्यात आली. मात्र कागदोपत्री मात्र दोनच वेळा कारवाई दाखवून एक कारवाई आर्थिक देवाणघेवाण करून दाबण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रूपये घेतल्याची चर्चा आहे.साकोली तालुक्यात सुगंधीत तंबाखू साकोली येथून पोहचविली जाते. साकोली येथे चार ते पाच दुकानात ही सुगंधीत तंबाखू विकली जात आहे. लॉकडाऊननंतर ही तंबाखू विक्री करण्यास शासनाने मज्जाव केला. मात्र तरीही साकोलीत सुगंधीत तंबाखू खुलेआम विकली जाते.मार्च महिन्यातील लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यात साकोली पोलीस ठाणे अंतर्गत धाड घालण्यात आली. त्यावेळी संबंधित दुकानदाराच्या गोदाममध्ये ही धाड टाकण्यात आली. ही धाड रात्री घालण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेला दिसली नसली तरी काही लोकांना दिसलीच. पोलिसांनी यावेळी यावर कठोर कारवाई करण्याऐवजी सेटींगच केली. लाखो रूपये घेवून प्रकरण दाबले.या प्रकरणाची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आले. तरीही या प्रकरणाची माहिती लोकप्रतिनिधीमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंत पोहचलीच. मात्र तरीही कारवाई काहीच झाली नाही. यानंतर जून महिन्यात भंडारा येथील गुन्हे अन्वेषन विभागाने एकोडी रोडवरील एका दुकानात धाड टाकून ५० हजारांची तंबाखू जप्त करून कारवाई केली तर, दोन दिवसापुर्वी एकोडी रोडवर एका ट्रान्सपोर्टच्या गाडीची चौकशी केली असता पोलिसांना त्यात सुगंधीत तंबाखू आढळली. मात्र ही तंबाखू कोणत्या दुकानदाराची होती याचा मात्र शोध लागला नाही. यावरून पोलीस किती प्रामाणिक तपास करतात हेच सिद्ध होते. कारण कोणतेही ट्रान्सपोर्टचे वाहन साहित्य पोहचवते, त्यावेळी त्या पार्सलवर दुकानाचे नाव असल्याशिवाय पार्सलच घेत नाही. पोलिसांनी कारवाई करून दोन दिवस उलटले, मात्र तंबाखू कोणाची याची साधी माहिती मिळू शकली नसल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे.त्या धाडसत्राची चौकशीएप्रिल महिन्यात एकोडी रोडवरील एका गोदामामध्ये धाड मारण्यात आली होती. धाड यशस्वीही झाली होती. मात्र पाणी कुठे मुरले हेच कळेनासे झाले. ना कारवाई झाली ना सुगंधीत तंबाखू ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक दखल घेतील काय, असा प्रश्न आहे.तो दलाल कोण?साकोली येथे धाड पडल्यानंतर संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी एका दलालाची मदत घेण्यात आली. या दलालाने सदर प्रकरण दाबण्यासाठी लाखो रूपयांची दलाली करण्यात आल्याची खमंग चर्चा आहे. वरीष्ठांनी यात सखोल चौकशी केली तर अनेकांचे पितळ उघडे पडू शकते.
साकोलीत सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:00 AM
साकोली तालुक्यात सुगंधीत तंबाखू साकोली येथून पोहचविली जाते. साकोली येथे चार ते पाच दुकानात ही सुगंधीत तंबाखू विकली जात आहे. लॉकडाऊननंतर ही तंबाखू विक्री करण्यास शासनाने मज्जाव केला. मात्र तरीही साकोलीत सुगंधीत तंबाखू खुलेआम विकली जाते. मार्च महिन्यातील लॉकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यात साकोली पोलीस ठाणे अंतर्गत धाड घालण्यात आली. त्यावेळी संबंधित दुकानदाराच्या गोदाममध्ये ही धाड टाकण्यात आली.
ठळक मुद्देदोन कारवाई : एका कारवाईचा पत्ता नाही, सदर प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा