सिहोरा परिसरात धानाचे गोदाम फुल्ल झाले. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया प्रभावित झाली आहे. धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली आहे. यामुळे शासनाने पुन्हा धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु जुने गोदाम फुल्ल असताना रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. परिणामतः ज्या ठिकाणी जागा मिळेल अशा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सिहोऱ्यातील आझाद क्लबच्या सुसज्ज इमारतमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर तरुणांचा विरोध व्हायला लागला आहे. आझाद क्लब तरुणाचे विकास कार्यासाठी असताना धान खरेदी केंद्रासाठी देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. आझाद क्लबचे इमारत बांधकाम करण्यात आले त्या उद्दिष्टापासून इमारत भरकटली असल्याचे आरोप गावात सुरू झाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तरुणाचे विकास कार्याकरिता इमारत मागविण्यात आली होती. परंतु आझाद क्लबच्या कार्यकारी मंडळाने दिली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या इमारतीत तरुणांचे सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जाऊ शकतात. परंतु या दिशेने प्रयत्न होत नाहीत. यामुळे तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या काळातील आझाद क्लब असून या क्लबमध्ये मलखांब, कसरत, कुस्ती, दंड बैठक, असे अनेक उपक्रम राबविण्यात येत होते. परंतु ते पडद्याआड गेले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सुसज्ज इमारत मंजूर करण्यात आल्यानंतर नव्या दमाने या इमारतीत नवीन उपक्रम राबविले जाणार असल्याची अपेक्षा तरुणांना होती. परंतु धान खरेदी केंद्र मात्र जलद गतीने सुरू करण्यात आले आहे. धान खरेदी केंद्राचे माध्यमातून आर्थिक नफा होत असल्याने धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. शासन स्तरावर अनेक इमारती असताना उद्दिष्टापासून कोसो दूर जात असल्याने तरुणांना न्याय मिळत नाही. असा आरोप तरुणांनी केला आहे.
सिहोरा परिसरातील गोदामांचे काय?
धानपट्ट्यातील प्रत्येक गावात गोदाम मंजूर करण्याची मागणी सर्वप्रथम सिहोरा परिसरातून झाली होती. परंतु एकही गावात गोदाम मंजूर करण्यात आले नाही. यामुळे धान खरेदी केंद्र सुरू करताना अन्य इमारतीच्या शोधात संस्था राहत आहेत. गावातील सभामंडप गोडाऊन म्हणून उपयोगात आणले जात आहेत. यामुळे काही समाजातील नागरिक दुखावत आहेत. दरम्यान, गावात गोदाम मंजुरीची ओरड सुरू झाली आहे. परंतु या रास्त मागणीला बेदखल करण्यात येत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना मदतीसाठी तात्पुरते स्वरूपात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरच तरुणांचे सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी प्रयत्न केले जाईल. आजाद क्लबची सुसज्ज इमारत तरुणांची आदर्श पिढी घडविण्यासाठी उपक्रम राबविणार आहे.
गंगादास तुरकर, अध्यक्ष, आझाद क्लब, सिहोरा.