आईच्या नावावर पीककर्जाची थकबाकी असल्याचे कारण संस्थेने पुढे करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सिहोराचे सभासद असतानाही मोतीलाल ठवकर यांना संस्थेने पीककर्ज नाकारले होते. शेतकऱ्यांची कैफियत संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जाणून घेतली नाही. ठवकर यांच्या आई आजारी असल्याने त्यांना पीककर्जाची परतफेड करता आली नाही. आईच्या नावावर पीककर्जाची थकबाकी असल्याच्या कारणावरून त्यांना पीककर्ज मंजुरी नाकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सदैव भांडणाऱ्या किसान संघाच्या जिल्हाध्यक्षालाच पीककर्जापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने सर्वच स्तरांवरून विरोध पत्करावा लागला होता. त्यांनी उन्हाळी धान याच संस्थेला दिले होते. ८० क्विंटल धानाचे चुकारे अडल्याने त्यांनी आईचे कर्ज फेडले नाही. याच संस्थेकडे जवळपास २ लाखांचे चुकारे होते. परंतु पीककर्ज मंजूर करताना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ऐकले नाही. यानंतर न्यायासाठी सहायक निबंधकांचा दरवाजा ठोठावला असल्यानेच त्यांना न्याय मिळाला आहे. २३ ऑगस्टला सहायक निबंधकांनी शेतकरी मोतीलाल ठवकर यांना पीककर्ज देण्याचे निर्देश सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाला दिले आहेत.
किसान संघाच्या जिल्हाध्यक्षाला अखेर पीककर्ज देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:38 AM