जवाहरनगर (भंडारा) : गुणवत्ता तालिकेमध्ये असलेल्या दरबान पदासाठी दिव्यांग उमेदवार काशिनाथ शेंडे यांना ठाणा येथील ताराचंद हटवार नामक आयुध निर्माणी कर्मचाऱ्याने नोकरीची हमी दिली. यासाठी ३ लाख ५० हजार रुपयांनी गंडविले. याबाबत तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. संबंधित अधिकारी आयुध कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
२०१६ मध्ये आयुध निर्माणी भंडारा येथे दरबान पदासाठी भरती प्रक्रिया झाली. यात दिव्यांग श्रेणीत निहारवाणी निवासी काशिनाथ परसराम शेंडे यांनी भरती प्रक्रियेत सामील होऊन गुणवत्ता तालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. आयुध निर्माणी रुग्णालयात कार्यरत ताराचंद हटवार यांनी शेंडे यांना सांगितले की, माझी ओळख महाप्रबंधक व कर्नलशी आहे. पास करून दरबान पदावर नियुक्ती करून देतो, असे म्हणून चार लक्ष रुपये देण्याची मागणी केली.
मागणीनुसार शिवम बँकेकडून दोन - दोन अशाप्रकारे चार लाख कर्ज रुपयांचे काढले. आणि देवीदास साठवणे व नीलेश शेंडे दोन्ही निहारवानी निवासी यांच्या साक्षीने ताराचंद हटवार यांना दिले. परंतु नियुक्तीपत्र काशिनाथ शेंडे यांना मिळाला नाही. पैसे परत करण्याच्या तगादा १७ मार्च रोजी लावलेला असता, व्यक्तीने काशिनाथ यांना उलट शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.
माझी तक्रार आयुध निर्माणीत केल्यास, काशिनाथ सह परिवारास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांत व पोलीस अधीक्षक आणि आयुध निर्माणी भंडारा येथे ताराचंद हटवार विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान आयुध निर्माण भंडारा म्युनिशन इंडिया लिमिटेड द्वारे विभागीय अधिकारी जी. व्ही. कुंभलकर यांच्या २६ सप्टेंबरच्या पत्रानुसार साक्षीदार व संबंधित प्रकरणातील दस्ताऐवज दहा दिवसात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आयुध निर्माणी व पोलीस प्रशासन हटवार यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.