धनंजय देशमुख यांचे आवाहन : जांभोरा येथे एक दिवस मजुरांसोबत उपक्रमकरडी (पालोरा) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरांनी निव्वळ मजुरीवर अवलंबून न राहता, गट तयार करून उद्योग करायला शिकले पाहिजे. लहान लहान उद्योगातून मोठे उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मजुरांनी घेतला पाहिजे. या नंतरचा एक दिवस मला उद्योगशिल मजुरांसोबत घालवायला आवडेल, असे प्रतीपादन मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी केले.जांभोरा येथे एक दिवस मजुरांसोबत उपक्रमानिमित्त ते जांभोरा ग्रामपंचायत कार्यालयात मजुरांना संबोधित करताना बोलत होते. मजुरांना उद्योगशिल होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.अध्यक्षस्थानी मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख होते. प्रमुख अतिथी खंड विकास अधिकारी गजानन लांजेवार, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, सरपंच भूपेंद्र पवनकर, पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, कृषी सहाय्यक बारापात्रे, रोहयो तांत्रिक अधिकारी कडव, आरोग्य विस्तरार अधिकारी आडे, तांत्रिक पॅनल अधिकारी खापेकर, तांत्रिक अभियंता महेश निमजे, रमेश चौधरी, नितीन सिंगाडे, ग्रामविकास अधिकारी एच.एस. वाढई, मुंगसुमारे, ग्रामपंचायत सदस्य राजधर शेंडे, जगदीश गोबाडे, वाघाडे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रत्येकाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुका, मंडळ, पर्यवेक्षक व सहायकांशी संपर्क साधला तर नक्कीच लोकांपर्यंत पोहचतील. लोकसहभाग हा विकासाचा केंद्र बिंदू असला तर सर्वांना प्रगतीची फळे चाखता येतील, त्यासाठी मजुरांनी सुद्धा मनाची तयारी ठेवली पाहिजे. मजुरीप्रधान कामांबरोबर जलसंधारण व भूसंधारणाची कामे गावात कशी होतील, यासाठी नियोजन ग्रामसभांतून करायला लावले पाहिजे. तरच गावाचा सर्वांगिण विकास साध्य होईल, असे विचार तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.रोहयो तांत्रिक पॅनल अधिकारी कडव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. लोकांच्या सक्रीय सहभागामुळे तालुक्यात सर्वाधिक रोजगार हमी योजनेची कामे जांभोरा गावात सन २०१५-१६ या वर्षात करता आली. लोकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच पवनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने मजूर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सरपंच भूपेंद्र पवनकर, ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी देवदास गहाणे, ज्ञानेश्वर नेवारे यांनी सहकार्य केले. एक दिवस मजुरांसोबत या उपक्रमाने ग्रामीणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. (वार्ताहर)
मजुरांनो उद्योगशील होण्यासाठी संघटित व्हा
By admin | Published: October 05, 2016 12:43 AM