संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट : आरोपमूल : नगर परिषद मूल अंतर्गत आठवडी बाजारात नगरोत्थान योनजे अंतर्गत ४३ लाख रुपये खर्च करुन संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे आहेच, त्याबरोबरच नगर परिषदेने रस्त्यासाठी जागा न सोडता संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केल्याने नगर परिषदच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप नगरसेवक महेश हरडे यांनी केला आहे.नगर परिषद मूल येथे बुधवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात नागरिकांना त्रास होऊ नये, स्वच्छता राहावी या उद्देशाने संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले. ४३ लाख रुपये खर्चू करुन बांधण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतीसाठी रस्ता सोडणे आवश्यक होते. आठवडी बाजारासाठी वाहनाची तुडूंब गर्दी असते. त्यामुळे दोन वाहने निघणे कठीण असते. जवळच शासकीय गोदाम असल्याने वाहनाची सतत रेलचेल असते. तसेच या ठिकाणी भर वस्ती असल्याने लोकांची ये- जा याच रस्त्यावरुन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे संरक्षण भिंत बांधताना जागा सोडणे आवश्यक असताना नगर प्रशासनाने जागा न सोडता बांधकाम केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यात पुन्हा नाली केल्यास रस्ता पुन्हा अरुंद होण्याची शक्यता आहे. या संरक्षण भिंतीच्या कामात सिमेंट विटा व लोखंडी सलाख निकृष्ठ दर्जाचे वापरण्यात येत आहे. याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक महेश हरडे यांनी केला आहे. सदर संरक्षण भिंतीचे काम त्वरीत थांबविण्यात येऊन कामाची चौकशी करावी, असे न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक हरडे यांनी दिला आहे. याबाबत चौकशी करुन न्याय देण्याची मागणी मुख्याधिकारी यांचेकडे केली असून निवेदनाच्या प्रति नगरविकास मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूल नगर परिषदच अतिक्रमणाच्या विळख्यात
By admin | Published: July 31, 2015 1:19 AM