मोहाडी : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच त्यांना शासकीय विमा संरक्षण देण्यात यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने निवेदनातून शासनाकडे केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यात भंडारा येथील शिवचरण कुरंजेकर, तुमसर येथील झाडू किरनापुरे, आंधळगाव येथील शालिक डेकाटे, लाखांदूर येथील ज्ञानेश्वर बडोले यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून दुकानदार धान्य वाटप करीत आहेत. मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या परिवारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. तसेच सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांचा ५० लक्ष रुपयांचा शासनाने विमा उतारावा................... अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ई-पाॅस मशीनवर ग्राहकांचे थम्ब घेण्याऐवजी दुकानदारांचे थम्ब अधिप्रमाणित करण्यात यावेत. त्यानुसार धान्य वाटपाची मुभा देण्यात यावी. कोरोनाची झळ जोपर्यंत कमी होत नाही, तोवर धान्य वाटप दुकानदारांचे अंगठे लावूनच करण्याचे आदेश तत्काळ काढण्यात यावे.
स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत २९० प्रति क्विंटल प्रस्तावित केल्याप्रमाणे कमिशन मार्जिन लागू करण्यात यावी, कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्या परवाना धारकांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी व ५० लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी. धान्य वाटप करताना १ ते १.५ किलोग्रॅम घट येते ती ग्राह्य धरण्यात यावी. गोदामातून ५० किलोग्रॅम ५८० ग्रॅम वजनाचे धान्याचे कट्टे देण्यात यावेत. दुकानदारांना नगर पालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावरून दुकानभाडे, वीजबिल, स्टेशनरी देण्यात यावी. भंगार झालेल्या ई-पाॅस मशीन बदल करून नवीन ४-जी चे कनेक्शन जोडण्यात यावे. मोबाईल रिचार्जचा खर्च संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात यावा. पीएमजीकेवाय योजनेअंतर्गत धान्य वाटपाचे ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंतचे कमिशन देण्यात यावे. धान्य दुकानदारांकडून होणारी हमालीची लूट थांबविण्यात यावी. दुकानदारांनी दिलेली हमालीची रक्कम कंत्राटदारांच्या देयकातून वसूल करण्यात यावी आदी मागण्या शासनाने एप्रिल महिन्याअखेर न सोडविल्यास कोणतीही चर्चा न करता १ मे पासून शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी भंडारा जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे, सचिव मिलिंद रामटेके, उपाध्यक्ष ओमप्रकाश थानथराटे, बाळू बोबडे, हितेश सेलोकर, गुलराजमल कुंदवाणी, विनय सूर्यवंशी, मनोहर लंजे, वाल्मीकी लांजेवार, जयगोपाल लांडगे आदींनी दिला आहे.