लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कमी पाण्यात अधिक उत्पन्न काढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सुक्ष्म सिंचन योजना राबविली जाते. ठिबक व तुषार सिंचनासाठी प्रोत्साहन अनुदानही दिले जाते. या योजनेत भंडारा जिल्ह्यात १४०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असुन त्यापैकी विविध कारणांनी तब्बल ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेत. जिल्ह्यातील केवळ ४२४ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागते. अनेकदा लहान सहान कारणांसाठी अर्जही रद्द होतात. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १४०३ शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन योजनेतुन अर्ज केले. त्यापैकी ८९५ अर्ज रद्द झाले. ६०५ लाभार्थी अनुदानासाठी पात्र ठरले. परंतु जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला. १८१ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांनी संच खरेदी केले नसल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे दरवर्षी मार्च महिन्यात अनुदान मिळते. परंतु यावर्षी अद्यापही निधीची शाश्वती नाही.
४५% मिळते अनुदान
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शासनाकडून अल्प - अत्यल्प भुधारकांना ५५ टक्के तर पाच एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. ठिबक साठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च होऊन ३२ हजार अनुदान जमा होते तर तुषार सिंचनासाठी २० हजार खर्च आणि ८ हजार अनुदान मिळते.
अनुदान मिळण्यात आहेत अडचणीकेंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदान दिले जाते. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस अनुदान जमा होते. मात्र यावर्षी निधीची अद्यापही शाश्वती नाही. अनेक शेतकरी अर्ज करतात. परंतु संच खरेदीसाठी पैसे नसल्याने खरेदी होत नाही. परिणामी अनुदानाचा लाभ मिळत नाही.
तुषार सिंचन योजनेंतर्गत अर्ज केला होता. अर्ज मंजुरही झाला. पहिल्या टप्यात १२ हजार ५०० रुपये अनुदान मिळाले. मात्र दुसऱ्या टप्प्याचे ६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. योजना चांगले नाही मात्र निधी मिळत नसल्याने अडचण जाते.- येनूबाई भोयर, शेतकरी कोलारी
धान उत्पादक पट्यात भाजीपाला वाढीसाठी प्रयत्न होत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. कृषी विभागाचे कर्मचारी प्रोड्युसर कंपन्या व शेतकरी गटामार्फत प्रसिद्धी करीत आहेत. - हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक