भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असल्याने जिल्ह्यात शनिवार- रविवारी वीकेंड लॉकडाऊनाची घोषणा केल्याने बंद पाळण्यात आला होता. या बंदला भंडारेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा आगारातील ७१ बसेस जागेवरच उभ्या होत्या. शनिवार आणि रविवार दोन दिवसात तब्बल १४ लाखांचे नुकसान भंडारा आगाराचे झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसस्थानकात स्थानिक प्रवासी फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले. सर्वच शासकीय कार्यालये तसेच भंडारा बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासोबतच मृतांचाही आकडा वाढतीवरच आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल होताना दिसत आहे.
दोन दिवशी कडकडीत बंद पाळून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात एसटी ही अत्यावश्यक सेवा म्हणून एसटी प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. मात्र तरीही बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील स्थानिक प्रवाशांनी प्रवासासाठी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. यावेळी काही भंडारा आगारात निवडक कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे प्रवासी नसल्यानेच एरव्ही गजबजलेले बसस्थानक शनिवार-रविवारी मात्र बाहेरील जिल्ह्यातील प्रवासी वगळता बस स्थानकात शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.
बॉक्स
दोन दिवसात १४ लाखांच्या उत्पन्नाला फटका
राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहर वसले असल्याने भंडारा बसस्थानक हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे बसस्थानक आहे. गोंदिया, रायपूर, छत्तीसगड, भिलाई या ठिकाणी जाणारे प्रवासी येथून येजा करतात. मात्र बंदमुळे प्रवासीच आले नाहीत. परिणामी महामंडळाच्या भंडारा आगाराला १४ लाखांचा फटका बसला.
२) नागपूर हे भंडाऱ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असल्याने भंडारा ते नागपूर या बसेस दर अर्ध्या तासाला किमान एक तरी गाडी धावत असते. त्यामुळे कोरोना संसर्गातही धावणाऱ्या गाड्या मात्र शनिवार-रविवारी अपवादाने एकही धावलेली दिसून आली नाही.
३) शासकीय, अधिकारी, कर्मचारी शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी असल्याने आलेच नाहीत. त्यामुळे एरवी नेहमी नागपूरवरून येणारे प्रवासी मात्र शनिवारी-रविवारी.................. नसल्याने भंडारा आगारातून एकही बस धावलीच नाही.
बॉक्स
एसटी कर्मचारी म्हणतात, ड्युटी असेल तरच बोलवा आम्हाला
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच एसटी महामंडळातही ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे आदेश काढले आहेत. एसटी महामंडळात तांत्रिक तसेच ज्या चालक, वाहकांची ड्युटी आहे त्यांनाच कामावर बोलवा, बाकी कर्मचाऱ्यांची गर्दी व्हायला नको असे आवाहनही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कोरोना ठरतोय एसटीला तोट्याचे कारण ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने गेल्या काही दिवसापासून एसटीचे घटलेले उत्पन्न भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा एसटीची चाके थांबू लागली असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे.
कोट
कोरोनामुळे प्रवासीच आले नाहीत. त्यातच प्रशासनाने पुकारलेल्या बंदमुळे बाहेरून येणाऱ्या बसगाड्या सोडल्या तर आगारातील एकही बस सोडण्यात आली नाही. मात्र बस सुरू झाल्या तरीही प्रवाशांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझर वापरून कोरोना नियमांचे पालन करावे.
फाल्गुन राखडे,
आगारप्रमुख, भंडारा