आॅनलाईन लोकमतभंडारा : संस्कार भारती अखिल भारतीय कलासाधक संगम कार्यक्रम हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यात भंडारा जिल्ह्यातून २६ कलासाधकांनी सहभाग नोंदविला होता. विविध प्रांतातून आलेल्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची दाद मिळविली.या कार्यक्रमात रांगोळी, नाट्यसंगीत, संगीतनृत्य, लोकगीत यासह अन्य ग्रंथप्रदर्शनी, शस्त्र प्रदर्शनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनीचे अप्रतिम सौंदर्य येथे पाहायला मिळाले. भंडारा येथील चमूची चार गटात विभागणी करण्यात आली होती. यात दत्ता दाढी यांनी संस्कार भारतीच्या कलावंतांसाठी सोय केली होती. दिंडीसह विविध कार्यक्रमात या कलासाधकांनी सहभाग नोंदविला. यावेळी या चमूमध्ये उपस्थित स्वातंत्र्यविर सावरकर यांनी लिहिलेली प्रसिद्ध कविता सादर करण्याचा मान संगीत शिक्षक विनोद पत्थे यांना मिळाला. रांगोळी मध्ये चंदा मुरकुटे, अनघा चेपे यासह अन्य कलावंतांनी अप्रतिम कलेचे सादरीकरण केले. संस्कार भारतीच्या कलावंतांचा यासाठी ज्येष्ठ कलासाधक प्रा. सुमंत देशपांडे यांच्यासह अन्य कलावंतांनी उत्साह वाढविला.