मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. वाहनांद्वारे मजुरांची सध्या आयात-नियात सुरू असून यात शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे.जिल्ह्यात भात रोवणीच्या कामाला जोमाने सुरूवात झाली आहे. शेतशिवार मजुरांनी फुलले आहे. परंतु गावातील मजुर गावातील शेतात राबायला तयार नाही. ते बाहेरगावी अधिक मजुरीच्या आशेने जात असल्याने गावातील शेतकऱ्यांना बाहेरगावारून मजुरांची आयात करावी लागत आहे. पालांदूर परिसरात सध्या किटाडी, चिखली, सानगाव, सायगाव, खराशी, दिघोरी येथून मजूर आणावे लागत आहे. खाजगी वाहनातून या मजुरांना आपल्या शेतात आणले जाते. काही वाहन चालकच या मजुरांचे ठेकेदार झाले आहेत.वीस ते तीस रूपये प्रती मजूर भाडे घेवून शेतापर्यंत त्यांना सोडल्या जात आहे. २०० ते ३०० रूपये मजुरी द्यावी लागते. उलट गावातील मजुर बाहेरगावी जात असल्याने दिसून येते. पालांदूर गावातील मजूर लाखनी परिसरात रोवणीसाठी जातात. तर पालांदूरमध्ये बाहेरगावचे मजूर येत आहे. मजुरांच्या या पळवापळवीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गावात साधारणत: शंभर ते १५० रूपये मजुरी मिळते. परंतु तेच मजूर बाहेरगावी गेले तर २०० ते ३०० रूपये मजुरी मिळते. याच आशेने अनेक महिला खाजगी वाहनांमध्ये दाटीवाटीने बसून दोन पैसे अधिक मिळतील म्हणून बाहेरगावी जाताना दिसत आहे.पऱ्हे झाले दीड महिन्याचेधान रोवणीसाठी शेतकºयांनी नर्सरीत टाकलेले पºहे आता ४० ते ४५ दिवसाचे झाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने रोवणी खोळंबली होती. परिणामी नर्सरीतच पऱ्हे वाढले आहे. धानाचा हंगाम यंदा उशिरा होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या २५ टक्केच्या आसपास रोवणी झाली असून मजूर टंचाईने रोवणी करणे कठीण जात आहे. मजूर मिळविण्यासाठी शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. अधिक पैशाचे आमिष देवूनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे. यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांवर निसर्ग रूसला असून आता मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
रोवणीसाठी मजुरांची बाहेरगावाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:52 AM
दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत.
ठळक मुद्देपरगावात मिळते अधिक मजुरी : शेतमालकाला मजुरांसाठी करावी लागते वाहनांची व्यवस्था