भंडारा/ गोंदिया : दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २४०० वर घरांची पडझड झाली असून भंडारा जिल्ह्यातील ३८ मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र दाणादाण उडाली असून अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. पुराचा २५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. २०० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
गत २४ तासांत १९.७ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसाने बुधवारी रात्रीपासून उसंत घेतल्याने सर्वांना माेठा दिलासा मिळाला. मात्र दाेन दिवस झालेल्या पावसात जिल्ह्यातील ८७० घरांची पडझड झाली. तर जनावरांचे ६६ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार ७८० हेक्टर क्षेत्रापैकी अतिवृष्टीचा फटका ४५५ गावांतील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान धान पिकाचे झाले आहे.
नदीनाल्याचे पाणी वस्तीत शिरल्याने जिल्ह्यातील २०० वर कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. सर्वाधिक माेहाडी तालुक्यातील ९७ कुटुंबांचा समावेश आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग बंद असून गुरुवारी ३८ मार्ग बंद पडले हाेते. दरम्यान वैनगंगेने धाेक्याची पातळी बुधवारी रात्री धाेक्याची पातळी ओलांडली हाेती. गुरुवारी दुपारनंतर पूर ओसरायला लागला. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात दीड हजारावर घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांतील दहा ते बारा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले, तर अनेक नाल्यांच्या पुलावरून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पाणी वाहत होते. त्यामुळे दहा ते बारा मार्ग बंद होते. पुरामुळे हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने ती सडण्याची शक्यता बळावली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे नवेगावबांध, बोदलकसा जलाशय ओव्हर फ्लो झाले, तर पुजारीटोला, कालीसरार, संजय सरोवर या धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळी वाढली आहे.