‘वॉटरफुल अॅण्ड ग्रीन मोहाडी’अधिकाऱ्यांनी शोधला उपाय : मूर्तरुप देण्याची तयारी राजू बांते मोहाडी हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, निळीतूनी पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी या ओळी वास्तव्यात उतरविण्यासाठी मोहाडीचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला लवकरच मूर्त स्वरुप देण्यासाठी आखणी केली जात आहे.दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. माणसापेक्षा पशु, पक्ष्यांना पाण्याच्या थेंबासाठी इथून तिथे उडत जावं लागतं. पाण्याची भटकत जाणारा पक्षी प्राणही गमावतो. हे वास्तव आहे. अगदी हाच धागा पकडून मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, नायब तहसीलदार डॉ.गौरीशंकर चव्हाण, महात्मा फुले हायस्कुल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, कृषी पर्यवेक्षक विकास झलके, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी तहसीलदारांच्या कक्षात सभा घेतली. मोहाडी येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. पिण्याच्या पाण्यावर उपाय शोधला जावा अशी संकल्पना मांडली गेली. मोहाडीच्या जलपातळीत वाढ, भूगर्भात पाणी सातत्याने जिरवता आले पाहिजे यावर ‘फुल वॉटर अॅण्ड ग्रीन मोहाडी’ हाच उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर अडीच किलोमीटरचा नाला खोलीकरण जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा कोल्हापुरी बंधारा दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ७५ लाख रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. जलसंधारणामुळे पाणी जिरणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. पाणी टंचाईवर मात करता येणार आहे.स्मशानभूमी ते न्यायालया जवळील नाल्यापर्यंत एका दिशेने पाऊलवाट. त्या वाटेवर वृक्ष लागवड करण्याची संकल्पना सूचविण्यात आली. मोहाडीकरांना सकाळची पहाट, झाडावर किलबिलणारे पक्षी, नाल्यात झेप घेऊन पाण्याची तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गिक अनुभव करता यावा. अडीच किलोमिटरची पायवाट मन प्रसन्न करत व्यायाम करता यावा हे स्वप्न कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोहाडी व तालुक्यातील दानशूर व्यक्ती ‘वॉटरफुल व ग्रीन मोहाडी’ या संकल्पनेसाठी सढळ हाताने मदत करावी, अशी अपेक्षा तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. परंतु ७५ लाख रूपये सामान्य हाताच्या मदतीने जमा होणार नाही, याचीही कल्पना सभेत स्पष्ट केली गेली. त्यासाठी मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग कंपनी व तुमसर तालुक्यातील मॅग्नीज ओर इंडियाच्या मालकांनी समाजाची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) चा भाग समजून आर्थिक मदत करावी यासाठी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.मोहाडीत हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोहाडी शासकीय कार्यालयाच्या विभागप्रमुखांची २० एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सभा बोलाविण्यात आली आहे. नाला खोलीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याची जबाबदारी कृषी पर्यवेक्षक विलास झलके, राहुल गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाल्यातून ३० हजार ट्रॅक्टर माती काढण्यात येणार आहे. खोली दोन मिटर असेल. त्या नाल्यात १० कोटी लिटर पाणी साठवणूक क्षमता निर्माण करण्यात येईल. एक हजार झाडे पाऊलवाटेने लावण्यात येतील. एक दिवस मोहाडीसाठीजलसंधारण चवळव व्हावी. या चळवळीला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे यासाठी १ मे कामगार दिवसाला एक दिवस मोहाडीसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. १ मे श्रमदानाचा दिवस असेल. श्रमदानामुळे जवळील गावांना उर्जा देण्याचे कार्य केले जाणार आहे.वॉटर फुल व ग्रीन प्रोजेक्ट पाणी टंचाईवर चांगला होऊ शकतो. श्रम व लोकसहभागातून मोहाडीसाठी मोठे कार्य केलं जाऊ शकते.-धनंजय देशमुख, तहीलदार मोहाडीसंरक्षित सिंचन होईल पाण्याचा पुनर्भरण होणार त्यामुळे शेती समृद्धी सोबत पाणी टंचाईची तिव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी
By admin | Published: April 16, 2017 12:17 AM