भंडारा : कोरोनाबाधितांची संख्या गत आठवड्यात वाढत असतानाच सीटी स्कॅन व स्टेराॅईड चाचणी करणाऱ्यांची संख्याही वाढली होती. एकट्या भंडारा शहरात जिल्हा रुग्णालयासह पाच ठिकाणी सीटी स्कॅन केले जाते. मात्र सीटी स्कॅन व स्टेराॅईड चाचणी कोरोना रुग्णांसाठी घातक ठरू शकते, अशी बाबही आता समोर येऊ लागली आहे. उल्लेखनीय म्हणजे गरज असल्यास ही चाचणी करावी, असेही बोलल्या जात आहे.
कोरोना रुग्णांच्या संदर्भात नातेवाईक अत्यंत संवेदनशील असतात. अशा प्रसंगी रुग्णाची चाचपणी झाली पाहिजे, असा हट्टही धरला जातो. एकट्या भंडारा शहरात चार ठिकाणी सीटी स्कॅन व अन्य चाचणी केली जाते. या चाचणीसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक सकाळपासूनच नंबर लावण्यासाठी येत असतात. रुग्ण हजर असणे ही आवश्यक बाब आहे. त्यातही सकाळी ९ वाजता आलेल्या रुग्णाला तब्बल तीन ते चार तासाचा कालावधी लागतो. त्यानंतरही आलेल्या अहवालावर संबंधित डाॅक्टरांशी चर्चा किंवा सल्ला घेऊन औषधोपचार केला जातो. मात्र वारंवार एकाच रुग्णाची सीटी स्कॅन करू नये, अशी बाब समोर आली आहे. सीटी स्कॅन करताना निघणाऱ्या किरणांमुळे त्याचा शरीरावर प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बुरशीजन्य आजाराचा धोका
कोरोना संकटकाळात अन्य आजाराचा धोकाही बळावला आहे. न्यूमोनिया, टायफाईड, डायरिया यासारखे आजारही फोफावत आहेत. बुरशीजन्य आजाराचा धोका वाढत असतानाच त्याचे रुग्ण मात्र आपल्याला कोरोनाच झाला की काय, असे बोलून दाखवितात. त्यामुळे अन्य आजारांची लक्षणे ओळखून त्यावर त्यानुसारच औषधोपचार करावा, अशी गरज आता निर्माण झाली आहे.
जिल्हा रुग्णालय वगळल्यास खासगी रुग्णालयात गेल्यास सर्वात प्रथम कोरोना चाचणीसाठी बाध्य केले जाते. चाचणी केल्यानंतरच संबंधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच अन्य आजाराबाबत विचार केला जातो, असेच दृश्य दिसून येते.
सीटी स्कॅन होतात दररोज
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅनची व्यवस्था असून, भंडारा येथील चार खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा आहे. येथून एका सेंटरवर ३५ ते ४० रुग्णांचे दररोज सीटी स्कॅन होत असते. यावरून आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात रोज १९० पेक्षा जास्त रुग्णांची सीटी स्कॅन होत आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन होत असले तरी यासाठी रुग्ण व नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागत आहे. ४० पेक्षा जास्त रुग्ण झाल्यास काही रुग्णांना आल्यापावली परत जाण्याचा कटू अनुभवसुद्धा आला आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर सीटी स्कॅन केले जाते.
एक सीटीस्कॅन म्हणजे ८० ते १०० एक्स-रे
एक सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णाकडून जवळपास ३,५०० रुपये शुल्क आकारले जात आहे. एक सीटी स्कॅन करणे म्हणजे जवळपास ८० ते १०० एक्स-रे प्रिंट होत असतात. याच आधारावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आपला अहवाल सादर करतात. फुफ्फुसामध्ये झालेले संक्रमण व त्याचा स्कोअर किती आहे, याचा परफेक्ट अंदाज बांधला जातो. त्यावरूनच अहवालाला अंतिम रूप दिले जाते. रुग्ण व्यक्तीला काही ॲलर्जी असल्यास ते सांगणे गरजेचे आहे.