इंद्रपाल कटकवार
भंडारा : जून महिन्याच्या २१ तारखेपासून जोमाने लसीकरणाला प्रारंभ झाला होता. मात्र, पुन्हा एकदा लसीकरणाला संथ गती आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: आतापर्यंत मंगळवारी दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी १३.४६ इतकी आहे. याबाबतीत ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असले तरी पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३९.६७ टक्के इतकी आहे. किंबहुना उद्दिष्टापैकी लसीकरण धीम्या गतीने सुरू आहे. लसींचा पुरवठा त्या प्रमाणात होत नसल्याने ही समस्या उद्भवत आहे.
बॉक्स
जिल्ह्यात असे झाले लसीकरण
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण पाच लक्ष १९ हजार ९५४ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम डोस व द्वितीय डोस घेतले आहेत. मात्र, यापैकी लसीची दुसरी मात्रा घ्यायचे काही कर्मचारी बाकी आहेत. फ्रंटलाइन वर्कर्सअंतर्गत १५ हजार ९१३ कर्मचाऱ्यांनी प्रथम, तर दहा हजार १७० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ या वयोगटातील एक लक्ष ३० हजार ९९ तरुणांनी प्रथम, तर दुसरा डोस केवळ ७११३ जणांनी घेतला आहे. ४५ वयोगटावरील १ लाख १६ हजार ६९९ जणांनी पहिला, तर ४८ हजार ५३४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षे वयोगटावरील १ लाख १४ हजार ४९२ ज्येष्ठांनी लसीचा पहिला डोस, तर ५६७४८ ज्येष्ठांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यात अन्य वयोगटांपेक्षा ज्येष्ठांची लस घेण्याची टक्केवारी अधिक आहे.
बॉक्स
९८ केंद्रांवर सुरू आहे लसीकरण
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात एकूण ९८ केंद्रांचा समावेश आहे. बुधवारी याच केंद्रांमधून लसीकरण सुरू होते. बुधवारी दिवसभरात ४०५५ जणांना लस देण्यात आली. यात साकोली उपकेंद्र, पारडी, शिवनीबांध, चोवा, बेलाटी, नेरला, दहेगाव, राजेगाव, मोहर्णा, दवडीपार, कोका, देव्हाडा, तिर्री, पळसगाव, खांबा, कोंढी, भंडारा, डोंगरगाव आदी ठिकाणी लसीकरण होत आहे.
कोट
प्रथम डोस घेऊन ५४ दिवसांचा कालावधी झाला आहे. ८४ दिवसांनंतर मला लसीकरणाचा दुसरा डोस मिळणार आहे. तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच एकमेव रामबाण औषध आहे.
- महेश गोटेफोडे
मी २२ जून रोजी लस घेतली होती. त्यानंतर मला मोबाइलवर सप्टेंबर महिन्यात दुसरा डोस घेण्यासंदर्भात संदेश आला आहे. लस घेतल्यानंतर मला ताप आला. मात्र, मिळालेली औषधी घेतली. परिणामी मला अन्य कुठलाही परिणाम जाणवला नाही.
- नंदू बावणे