लाखांदूर (भंडारा) : खरिपाच्या सुमारास पावसाच्या पाण्याने मामा तलाव ओव्हर फ्लो होतो. दरवर्षी शेतात पाणी पसरते. यंदाही तेच झाले आहे. चिकना गावातील मामा तलावाच्या बॅकवॉटरमध्ये २५ एकरातील शेती बुडाली आहे. असे असूनही जलसंधारण विभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लाखांदूर तालुक्यातील चिकना गावातील गटक्रमांक १५ आराजी ७.१७ हेक्टर आर. क्षेत्रात शासनाच्या जिल्हा परिषदे अंतर्गत जलसंधारण उपविभागा अंतर्गत मामा तलावाचे बांधकाम करण्यात आले आहे. या तलाव परिसरात स्थानिक काही शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतीत खरिपाच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांकडून धान पिकासह अन्य विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून खरिपाच्या सुमारास पावसाच्या पाण्याने मामा तलाव ओव्हर फ्लो होऊन तलावाचे बॅकवॉटर परिसरातील शेतशिवारात पसरते. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांपासून तलावाच्या बॅकवॉटरने पिकांच्या नुकसानीला घेऊन मागील २ वर्षांपूर्वी या तलावाच्या खोलीकरणासह तलावावर गेटचे बांधकाम करण्यात आले. मात्र, तलावाच्या गेटसह खोलीकरणाच्या सदोष बांधकामाने यावर्षी देखील तलाव ओव्हर फ्लो होऊन तलावाचे बॅकवॉटर शेतशिवारातील पिकांत पसरले. मागील १५ दिवसांपासून तलावाच्या बॅकवॉटरने तलाव परिसरातील जवळपास २५ एकरांतील धान पिकासह अन्य पिके पाण्याखाली डुबली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा दिल्यावर आली जाग
दरवर्षी तलावाच्या बॅकवॉटरने लाखो रुपयांच्या खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शासनाच्या जलसंधारण उपविभागाकडून तत्काळ उपाययोजनेच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. ३ ऑगस्टपासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा देताच साकोली येथील जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चाचेरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ओवर फ्लो तलावातून पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन उपोषण रद्द करण्याचा आग्रह केला.
...तर पुन्हा आंदोलन
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा मागे घेतला आहे. मात्र, ही समस्या पुन्हा उद्भवली तर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा चिकना येथील रोशन सोनपिंपळे, गिरीधर उरकुडे, कृष्णा लोहारे, संतोष अंबादे, नानाजी कुत्तरमारे यांच्यासह १० क्षतीग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.