लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पूरग्रस्त, परतीचा पाऊस मुळे बेजार झालेल्या सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाने नवीन संकट निर्माण केले आहे. उभ्या धान पिकांना जाळण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.वैनगंगा, बावणथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात या अनेक संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण चौपट झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता नवीन संकट मानगुटीवर बसले असल्याचा प्रत्यय या परिसरात आलेला आहे. नद्यांचे खोऱ्यात असल्याने सुपीक शेतीचा शिक्का त्यांचे शेतीवर आहे. परिसरात पाण्याची कमतरता नाही. परंतु अस्मानी संकट त्यांना जगूच देत नाही. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली असता, नद्यांचे पुराचे पाणी गाव आणि शेतशिवारात शिरले. एक नव्हे तब्बल चार दिवस पुराचे पाण्याने थैमान घातले.उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते. या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली. धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे. हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांचे डोळ्यात अश्रू आहेत. परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.शेतकऱ्यांचे घरात एक पोती धान आले नव्हते. यामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांचे नेतृत्वाखाली चुल्हाड बस स्थानक परिसरात तुमसर बपेरा राज्य मार्गावर धानाची पेंडी जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते.