लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामातील धानपिकाला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पीकांवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. जिल्ह्यात आलेला महापूर तसेच तुडतुडा किडीचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी धान पिकाचे उत्पादन घटले आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्मचाऱ्यांमार्फत रबी पीकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच हरभरा पिकाच्या बीबीएफ पद्धत लागवडीचे धडे दिले जात आहेत. भंडारा तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड बेड तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करताना आंतरपीक म्हणून कोथिंबीर पीक रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवडीचे मार्गदर्शन केले. माटोरा येथील शेतकरी खुशाल शेंडे, यादोवराव ढेंगे, किशोर निंबार्ते, दिनेश भुते, डोनू सूर्यवंशी यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या पीकाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी केली आहे. भंडारा तालुक्यात हरभरा लागवडीखालील क्षेत्र मोठे असून यासाठी भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी विजय हुमणे, होमराज धांडे, पर्यवेक्षक माया कांबळे, कृषी सहाय्यक गिरिधारी मलेवार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने पेरणीचे मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांची बोलताना सांगितले. अनेक शेतकरी हरभरा, गहू, लाखोरी पिकांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करीत आहेत. कृषि विभागाच्या वतीने शेतकर्यांना बिजप्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिकातील मर रोगाचे प्रमाण कमी होत असून उत्पादनात अधिक भर पडत असल्याने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षित दाखविण्यात येत आहेत. शेतकरी रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकांची पेरणी करीत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होणार असल्याचेभंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हरभरा पिकासाठी रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून अनेक शेतकरी बीबीएफ पद्धतीने पेरणी करीत आहेत. शेतकऱ्यांना आंतरपिकाचेही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात रब्बीचे क्षेत्र मोठे असून कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करीत आहोत.- अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा
शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुनच पिकांची पेरणी करावी. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळते. बीबीएफ पद्धतीचे मार्गदर्शन गटनिहाय पद्धतीने करणे सुरु आहे. उत्पादन वाढीसाठी ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे. - गिरीधारी मलेवार, कृषी सहाय्यक,माटोरा.