येथील फुलचंद जगण चोपकर यांच्या घराशेजारी असलेल्या महालक्ष्मी राईस मिलच्या मालकांनी मिलमधील कोंढा, कुक्कुस, आदींचा धूळ रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी हा धूळ चोपकर यांच्या घरात घुसत असून, त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चोपकर यांच्या घरी चार भावांचे कुटुंब वास्तव्य करीत असून, कुुटुंबात १५ सदस्य आहेत.
सदर राईस मिलच्या प्रदूषणाविषयी चोपकर यांनी २०१८ पासून वारंवार तक्रारी केल्या; मात्र, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून त्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या. या राईस मिलच्या प्रदूषणामुळे चोपकर कुटुंबीयांचे जगणे असह्य झाले असून, कुटुंबीयांमध्ये श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चोपकर यांनी या राईस मिलच्या प्रदूषणाविषयी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, लाखांदूरचे ठाणेदार, मुख्यमंत्री, प्रदूषण मंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे तक्रार करून प्रदूषण रोखण्याची मागणी केली आहे. अन्यथा, २४ फेब्रुवारीपासून सर्व कुटुंबीयांसह राईस मिलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. उपोषणानंतरही योग्य कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.