पालांदूर : गत चार ते पाच दिवसांपासून आधारभूत खरेदी केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा असल्याने शेतकरी उन्हाळी धानमोजणीच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु लोकप्रतिनिधी मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहेत. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील आधारभूत केंद्रावर बारदाना नसल्याने धानखरेदी प्रभावित झालेली आहे.
१ मेपासून धानखरेदीचे आदेश असताना जून महिन्याच्या अर्ध्यात धानखरेदी सुरू करण्यात आली. उरलेल्या दिवसांत धानखरेदी निश्चितच अशक्य असून, धानविक्रीकरिता शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. आधार केंद्रांवरील ग्रेडरला विनवणी करीत दादा धानमोजणी होईल का गा? असा विनवणीवजा प्रश्न विचारला जात आहे. ग्रेडरसुद्धा प्रयत्नांच्या पुढे काय करू शकतो, एवढे बोलून शेतकऱ्याचे समाधान करतो.
संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धानखरेदीचा प्रश्न दोन्ही हंगामांत प्रामुख्याने उभा असतो. शासनाजवळ स्वतःची कोठारव्यवस्था अपुरी असल्याने खासगी कोठारांवर धानखरेदीचा डोलारा सजवला जातो. गत कित्येक वर्षांपासून ही समस्या आ वासून उभी आहे. मात्र, शासन अथवा शासनाचे प्रतिनिधी यावर अजूनही अपेक्षित प्रयत्नशील नाहीत. त्यामुळे धानखरेदी प्रभावित झालेली आहे. काही खरेदी केंद्रांनी कोठारव्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात मिळवली; परंतु त्यांना बारदान्याची समस्या भेडसावली आहे. खरेदी करणारे वरिष्ठ अधिकारी याबाबतीत वेळेत उपाययोजना करू न शकल्याने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी धानखरेदी बंद आहे.
गत खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाचा बोनस शासनाकडे थकीत आहे. इतर खर्चाचे व्यवहार थांबवून शेतकऱ्यांना बोनस व प्रोत्साहित निधी देणे नितांत गरजेचे आहे. खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांअभावी शेतकरी सावकाराच्या दारात उभा आहे. पीक कर्जाची रक्कम केव्हाचीच उचल करून खर्चसुद्धा झाली आहे. रोवणी व अन्य कामे पैशांविना करायची कशी, हा यक्ष प्रश्न आहे.
कोट
पालांदूर आधारभूत केंद्रांतर्गत गोडाउनअभावाने किटाडी येथे धानखरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ८४ शेतकऱ्यांनी धानविक्री केलेली असून, ३४७१.६० क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. ६०६ शेतकऱ्यांनी उन्हाळी धानविक्रीकरिता शासकीय ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली आहे. ३० जून ही शेवटची मोजणीची तारीख आहे. जुलै महिना मोजणीकरिता अत्यावश्यक आहे. बारदान्याअभावी धानखरेदी प्रभावित आहे.
-विजय कापसे, अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर
बारदानाव्यवस्था अगदी दोन दिवसांत केली जाईल. मागणी केली असून, बारदान्याचे ट्रक पोहोचताच केंद्रावर सोडले जातील.
-गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा