कोंढा-कोसरा: आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल अद्याप न झाल्याने पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान २२ गोदामात भरून आहे , सध्या एकही गोदाम शिल्लक नाही तेव्हा मार्केटिंग फेडरेशन जिल्हा कार्यालयातर्फे धानाची उचल न झाल्यास पवनी तालुक्यातील आठ केंद्र केव्हाही बंद पडून धान मोजणी ठप्प होऊ शकते. आठ दिवसापासून कोंढा केंद्राची धान मोजणी बंद आहे. परिणामी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .
पवनी तालुक्यात आधारभूत धान खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित पवनी तालुका यांना मान्यता दिली आहे, त्यानुसार आठ केंद्रावर आतापर्यंत १२ हजार टोकण शेतकऱ्यांना दिले आहे. त्यापैकी प्रत्येक केंद्रावर ३००च्या आसपास टोकण शेतकऱ्याचे धान्य मोजून झाले आहे. १० हजार टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांचे धान मोजून होणे बाकी आहे, यावरून मोजलेले धान कोठे ठेवायचे असा प्रश्न प्रत्येक आधारभूत केंद्राला पडला आहे, सध्या २२ गोदाम धान ठेवण्यासाठी आहेत ते याप्रकारे- वाही ४ ,चकरा ४ ,गोसे ९ ,अड्याळ २,चिखली १ ,खातखेडा १,कोदुर्ली१, हे सर्व गोदाम धान भरून पूर्ण आहेत. यानंतर मोजलेले धान कोठे ठेवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे, काही ठिकाणी उघड्यावर धान मोजणी सुरू आहे ,पण पाऊस पडला तर प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकते.
धानाची मोजणी झाल्यावर मार्केटिंग फेडरेशन, जिल्हा कार्यालयतर्फे त्या धानाचा आदेश काढून राईस मिल मालकांना भरडाईकरिता धान पाठवले जाते, तसे आदेश अजूनपर्यंत निघाले नाही . सध्या मिल मालकांचा धान्य उचल करण्यास विरोध असल्याची माहिती समोर येत आहे, यास कारण देखील शासनाचे आदेश कारणीभूत आहे ,शासनाने भरडाई रक्कम प्रति क्विंटल ४० रुपये वरून १० रुपये प्रति क्विंटल केले असून १०० किलो धानाचा उतारा ६५ किलो तांदूळ पाहिजे अशी अट घातली आहे. त्यामुळे याचा विरोध म्हणून धान भरडाई करण्यास विरोध केला आहे. अशा परिस्थितीत आधारभूत केंद्रावर धान गोदामात भरून आहे ,तेव्हा धान मोजणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे .कोंढा केंद्र गोसे येथे आहे, तेथे धान ठेवण्यासाठी जागा नाही त्यामुळे बंद आहे. धान उघड्यावर मोजून ठेवले तर आणि उघड्यावर असलेले धान्य खराब झाले तर त्यास मोजणी करणाऱ्या संस्थेस जबाबदार धरले जाते , त्याची रिकव्हरी संस्थेकडून होते, संस्थेकडे पैसे नसल्यास संचालक मंडळाच्या सदस्या कडून वसूल करण्यात येते. अन्यथा संचालकांवर गुन्हे दाखल केले जाते. त्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित पवनी तालुका उघड्यावर शेतकऱ्यांचे धान मोजण्यास हिंमत करतांना दिसत नाही , तरी देखील शेतकऱ्यांनी आग्रह धरला म्हणून वाही , पवनी, आणि खातखेडा येथे उघड्यावर धान मोजणी सुरू आहे.
बॉक्स
दहा हजार टोकण शिल्लक
अडीच महिन्यापासून धानाची उचल झाली नाही म्हणून , धानाची उचल करण्यासाठी खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित पवनीचे अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर यांनी मार्केटिंग फेडरेशन जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांची तसेच जिल्हाधिकारी , भंडारा यांची भेट घेऊन १३ जानेवारीला सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली आहे. २० जानेवारी पर्यंत सर्व गोदामात असलेले धान्य उचल करून ती खाली करावी म्हणजे दुसरे मोजलेले धान्य साठवता येईल , तसे न केल्यास २० जानेवारीपासून आधारभूत केंद्रावरील धान मोजणी बंद करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकारी यांना पत्र देऊन खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित पवनी तालुका अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर यांनी कळविले आहे.
पवनी तालुक्यात धान मोजणीची समस्या निर्माण होऊ शकते, यासाठी वेळीच तोडगा निघणे आवश्यक आहे, १० हजार टोकण बाकी आहेत , त्या शेतकऱ्याचे धान मोजले गेले पाहिजेत ,अन्यथा मोठा पेच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.