शेतकऱ्यांची फसवणूक : अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकटविशाल रणदिवे अड्याळखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करून शेतात पेरले. मात्र ते उगवलेच नसल्याने अड्याळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स व रायझिंग सन्स या कंपन्याचे हे बियाणे असल्याची माहिती समोर आली आहे. अड्याळ येथे सहा कृषी केंद्र आहेत. या कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने धान शेती करण्यासाठी बियाणांची खरेदी केली. पावसाळ्यापुर्वी शेतीची मशागत करून त्यात धान पऱ्ह्यांची पेरणी केली. आठवडा भरापुर्वी पेरणी केलेल्या धानाच्या बियाणांवर पावसानंतर उगवन होवून त्यातून धानाची रोवणी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तविली होती. मात्र बऱ्यापैकी पाऊस पडल्यानंतरही या बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. याबाबत त्यांनी खरेदी केलेल्या कृषी केंद्र संचालकांकडे संपर्क केला. यावर अनेकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर कृषी विभागाने सदर कंपन्यांचे बियाणे जप्त करून तपासणीकरीता पाठविण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देऊन त्यांची बोळवण करण्यात येत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे.कृषी केंद्र चालकांची धावपळवर्धा जिल्ह्यातील या कंपन्यांकडून खरेदी केलेले धान बियाणे शेतकऱ्यांना विकले. मात्र ते उगवले नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत असल्याने कृषी केंद्र चालकांची धावपळ सुरू झाली आहे. यातील अनेकांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे धान बियाणे दिले. तर काही संचालकांनी खरेदी केलेल्या धान बियाणाचे बिल परत मागवून त्यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटआठवड्याभरापुर्वी पेरलेले धान बियाणांची उगवण क्षमता नसल्याचे सिद्ध झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान या बियाणांसाठी हजारो रूपये खर्च करण्यात आले व पऱ्ह्यांचा कालावधीही निघून गेला आहे. परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कृषी अधिकारीच फसलेतालुक्यातील कृषी विभागात कार्यरत एका अधिकाऱ्याने त्यांच्या शेतात याच कंपनीचे धान बियाणे पेरले. यासाठी त्यांनी १५ बॅग खरेदी केल्यात. मात्र त्यांच्या शेताततही बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे कृषी विभागात कार्यरत असतानाही फसगत झाल्याने कुणाकडेही कैफीयत न मांडता बुक्यांचा मार सहन करीत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेले धान बियाणे उगविले नाही. त्यामुळे त्यांच्यात असंतोष असून कंपनीविरूद्ध ओरड सुरू आहे. मात्र कुणाचीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही.-एन. एम. मेश्राम, कृषी पर्यवेक्षक, अड्याळ.कृषी केंद्र संचालकांवर विश्वास ठेवून धान बियाणांची खरेदी केली. मात्र ते उगविले नाही. त्यामुळे कृषी केंद्र संचालकाने किंवा कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे परत करावे.-रविंद्र दशरथ गभने, शेतकरी अड्याळ.
‘धान’ पेरले पण उगवलेच नाही
By admin | Published: July 09, 2016 12:31 AM