लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पावसाने आधारभूत खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले शेतकऱ्यांच्या धानाची हजारो पोती ओलेचिंब झाली आहेत. गत महिन्याभरापासून विक्रीच्या प्रतीक्षेत असलेली धानाची पोती उघड्यावरच असून ढगाळ वातावरणानंतरही कोणतीच उपाययोजना केली नाही. ओला झालेला धान खरेदी केला जाणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसात जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला मोठा फटका बसला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तथा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली हजारो पोती पावसात ओली झाली. काही ठिकाणी प्लास्टिक ताडपत्री झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात धानाची हजारों पोती ओली झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस बरसतो परंतु बाजारसमिती शेड तयार करीत नाही. पुर्व विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारसमिती असतांनाही शेतकऱ्यांना माल मात्र येथे उघड्यावरच असतो. नाकाडोंगरी धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान ओला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो धानाची पोती ओलीचिंब झाली आहे. जैतपूर येथील केंद्रावर धान मोजण्यात दिरंगाई होत असून हजारों पोते उघड्यावर पडलेली आहे. धान मोजणीला उशिर झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. लाखनी तालुक्यात खरेदी-विक्री सहकारी समितीद्वारे आधारभूत धान खरेदी केली जात आहे. गोदाम हाऊसफुल झाल्याने धान खरेदी थांबली आहे. गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने लाखनी येथील उघड्यावरील धान ओला झाला. ओला झालेला धान अंकुरण्याची शक्यता आहे. धानाला आणखी दोनशे रुपये दरवाढ मिळाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी येथे धान आणला होता. अशी स्थिती तालुक्यातील जेवनाळा, कनेरी, गुरढा या गावातही आहे. पालांदूर येथे गुरुवारी पहाटे पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकºयांना धान पोती झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. ढगाळ हवामानामुळे कालपासूनच शेतकऱ्यांनी ताडपत्र्या झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री झालेल्या पावसाने आधारभूत केंद्रावरील धान ओला झाला.पवनी तालुक्यातील कोंढा येथील धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. गोदामाच्या कमतरतेने खरेदीची गती मंदावली आहे. परिणामी धानाचे पोते उघड्यावरच आहेत. याचा फटका गुरुवारी शेकडो शेतकऱ्यांना बसला.साकोली येथील उघड्यावरील धानालाही मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावल्याने उघड्यावरील धान पुर्णत: ओला झाला. सकाळी शेतकऱ्यांनी केंद्राकडे धाव घेतली. धान झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अर्धाअधिक धान ओला झालेला होता.धानपोते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळआधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेले धानाचे पोते ओले होऊ नये म्हणून ताडपत्री झाकण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसभर धावपड दिसत होती. अनेक शेतकरी आपल्या घरुन ताडपत्र्या घेवून आधारभूत केंद्राकडे धाव घेत असल्याचे दिसत होते. मात्र रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा धान ओला झाला होता. वरुन ताडपत्री झाकली असली तरी पोताखालून पाणी वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात धान ओला झाला. कोंढा येथील धान केंद्रावर शेतकऱ्यांनी ताडपत्र्या झाकल्या होत्या परंतु त्यानंतर शेतकऱ्यांना फटका बसला. वातावरण ढगाळ असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
उघड्यावरील धान ओलेचिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अवकाळी पावसाने आधारभूत खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले शेतकऱ्यांच्या धानाची हजारो पोती ओलेचिंब झाली आहेत. ...
ठळक मुद्देजिल्ह्यात अवकाळी पाऊस : आधारभूत खरेदी केंद्रावरील प्रकार, शेतकऱ्यांना फटका