चीचखेडा - कान्हळगावच्या शिवारात हरणांचे कळप मुक्तपणे संचार करीत असतात. त्याच शिवारात एका हरिणीने पाडसाला जन्म दिला. हरीण व पाडस चरत असताना काही कुत्र्यांनी त्या पाडसावर हल्ला केला. एक कुत्र्या त्या पाडसाला तोंडात घेवून पळ शुक्रवारी सायंकाळच्या ५ वाजताच्या सुमारास काढत होता. शेतावर असलेल्या प्रवीण मोहारे यांनी ते दृश्य बघितले. त्या कुत्र्यांच्या मागे तो धावत सुटला. अखेर त्या कुत्र्यांला पकडण्यात यश आले. प्रवीणने पाडसाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. पण तो कुत्रा त्या पाडसाला सोडेना. तेवढ्यात प्रवीण मोहारे यांचा थोरला भाऊ राजू मोहारे शेतावर आला. प्रवीणने कुत्र्याच्या तोंडातच हात घातला. अखेर त्या पाडसाला कुत्र्याच्या तोंडातून बाहेर काढले. पाडस जखमी झाले. त्या पाडसाला प्रवीणने घरी आणले. त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. वनविभागाला कळविले.
वनपरिक्षेत्र कांद्री येथील परिक्षेत्र अधिकारी डी. बी. वानखेडे, वनरक्षक उमराव कोकडे, वनमजूर देवानंद पाटील, चूळामन कारेमोरे यांनी तात्काळ कान्हळगाव गाठले. सायंकाळी त्या पाडसाला त्याच शिवारात वनविभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोडून देण्यात आले.