राजीव गांधी योजना : नवीन दीनदयाळ योजना कागदावरचतुमसर : ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी महावितरणने सुरू केलेल्या राजीव गांधी मोफत वीज विद्युतीकरण योजनेला प्रतिसाद मिळाला असला तरी आता ही योजना बंद झाल्याने गरीब लाभार्थ्यांची परवड होत आहे.विद्युत महावितरण कंपनीने दारिद्र्य रेषेखालील समाविष्ट बीपीएल व एपीएलधारक लोकांना मोफत विद्युत कनेक्शन घेता यावे, यासाठी राजीव गांधी विद्युतीकरण योजना दोन वर्षापुवी सुरू केली होती. या योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना १५ रूपये भरून वीज जोडणीसह मीटर, वायर आदी साहित्य मिळून कनेक्शन दिले जात होते. गरज पडल्यास पोलचाही पुरवठा या योजनेद्वारे केला जात होता. त्यामुळे तुमसर तालुक्यात चार हजारच्यावर कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला होता. राजीव गांधी वीज विद्युतीकरण योजना यशस्वी झाल्यामुळे व वीज कंपनीवर अतिरिक्त भार पडल्याने ही योजना गुंडाळण्यात आलेल आहे. आतापर्यंत ५०० अर्ज तुमसर तालुक्यातून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. मागील दीड वर्षापासून या कुटुंबातील घरांना मोफत वीज कनेक्शन देण्यात आले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील काही घरे अंधारतच आहेत. दिवसेंदिवस वीज जोडणीचे प्रस्ताव वाढत असल्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतर आदिवासी बहुल व अतिदुर्गम भागातील नागरिकांना अंधारात जीवन जगण्याची वेळ आल्याने पंडित दीनदयाल उपाध्याय या नावाने ही योजना कार्यान्वित होईपर्यंत राजीव गांधी योजना सुरू ठेऊन दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील अंधार दूर करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
विद्युतीकरण योजना बंद झाल्याने लाभार्थ्यांची परवड
By admin | Published: July 30, 2015 12:45 AM