नेरला उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याचे काम मांगली, मचारना व जेवणाळाच्या शिवेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. हे काम दोन वर्षापासून जिथल्या तिथेच पेंडिंग आहे. काम पुढे सरकत नसल्याने स्थानिक नेत्यांनी चौकशी केली. यात ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी थेट महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दाद मागितली. संबंधित यंत्रणेला नाना पटोले यांनी कारणमीमांसा विचारीत तत्काळ खंडित काम मार्गी लावण्याचे सुचविले. वास्तव परिस्थिती लक्षात घेता जिथपर्यंत कालवा आलेला आहे, तिथपर्यंत समस्या नाही. मात्र जेवणाळा सीमेत महसूल की वनखाते या वादात पालांदूर सिंचन वितरिका अडलेली आहे.
०.८४ हेक्टर आर जमीन न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याने पालांदूर वितरिका थंड बस्त्यात आहे. काल-परवा मांगली मचारना परिसरात नेरला लिफ्टचे पाणी आले. पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. थांबलेली रोवणी पुन्हा सुरू झाली. पालांदूर अगदी ५ किलोमीटरवर असल्याने येथील शेतकरी मात्र कोरडाच ठरलेला आहे. जेवणाळा येथील ग्रामपंचायतने ठराव करीत भूमिगत बंधारा बांधण्याचा मार्ग मोकळा केला. माजी सभापती विनायक बुरडे यांनीसुद्धा या वितरिकेचे काम युद्धस्तरावर वेळेत व्हावे. याकरिता प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क केला. त्यांच्याशी वास्तव परिस्थितीवर चर्चा करीत भूमिगत नहराचे (कालवा) महत्त्व पटवून दिले. मात्र अजूनही काम पेंडिंग पडलेले आहे.