वाहणी येथील प्रकार : ट्रॅक्टरने आणली माती, मजुरांची बोगस नावेतुमसर : १०० दिवस मजूरांना कामे मिळावी म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल कामे शासन गावातच उपलब्ध करुन देते, परंतु तुमसर तालुक्यातील वाहनी येथील पांदण रस्त्यावर मजुरांऐवजी यंत्राने कामे करण्यात आली. मजूरांची बोगास नावे हजेरीपटावर दाखवून लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व पंचायत समिती स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.रोहयोंतर्गत अकुशल आणि कुशल कामाचा समावेश आहे. ६० टक्के निधी कुशल तर ४० टक्के निधी अकुशल कामावर खर्च करणे संबंधित यंत्रणेला बंधनकारक आहे. पंचायत समिती स्थानिक ग्रामपंचायततर्फे मजुरांना कामे उपलब्ध करुन देते. वाहनी ग्रामपंचायतीने नामदेव उपरीकर ते सुभाष ढबाले यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याला मंजूरी देऊन ७ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला परंतु ग्रामपंचायतीने सदर पांदण रस्त्याचे काम स्थानिक मजूरांकडून न करता जेसीबी यंत्राद्वारे करण्यात आले.पांदण रस्त्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावरील माती यंत्राने खोदून ट्रॅक्टरने वाहतूक करुन पांदण रस्ता तयार करण्यात आला. ११ फेब्रुवारी २०१६ ला काम सुरु करुन २४ फेब्रुवारीला बंद झाल्याचे नमूद आहे. सहा-सहा दिवसाचे दोन हजेरी पत्रक काढले असून यात १२ दिवस ७३ मजूरांनी काम केल्याचे दर्शविण्यात आले आहे. येथे प्रत्यक्षात मजूरांच्या हाताने कामेच करण्यात आले नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे.शेतकरी, शेतमजूरांच्या हाताला स्थानिक स्तरावर कामे मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय व राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना आणली. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा शासनाचा उदात्त हेतू नियमांना धाब्यावर बसवून यंत्राच्या सहायाने सर्रास कामे करुन घेत आहे. यामुळे मजूरांवर अन्याय होत असून कामाअभावी निश्चितच त्यांना गाव सोडून जाण्याची पाळी येते. गाव स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत पारदर्शी प्रशासनाचे अधिकारी, उपलब्ध असतांनी सर्रास यंत्राने कामे केल्याने त्यांचा कामाचा अधिकार तर हिरावून घेतला गेलाच, परंतु बोगस मजूरांना दाखवून लाखो रुपये हडप करण्यात आल्याचे समजते.वाहणी येथील पांदण रस्त्यापासून केवळ १०० मीटर अंतरावर राष्ट्रपाल गोमासे यांचे शेत असून त्यांनी माझ्या शेतातून माती घेऊन जाण्याची विनंती केली होती, परंतु त्यांच्या शेतातील मातीची उचल न करता ४०० मीटर अंतरावरुन माती ट्रॅक्टरने आणण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)अकुशल कामे मजूरांच्या हाताने करणे बंधनकारक आहे. वाहणी येथील तक्रार प्राप्त झाली असून सदर प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. नियमानुसार दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. - केशव गड्डापोड, खंडविकास अधिकारी, तुमसरशासनाच्या नियमानुसार स्थानिक मजूरांना कामे मिळणे अनिवार्य होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई शासनाने करावी. जेणेकरुन अशा अनियमिततेला आळा बसेल.- बालचंद बांडेबुचे, तक्रारकर्ता वाहणी
मजुरांना ठेंगा दाखवून यंत्राने तयार केला पांदण रस्ता
By admin | Published: March 20, 2016 12:31 AM