भंडारा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःची प्रगती साधायची असल्यास परिस्थिती गरीब, श्रीमंती ही महत्त्वाची नाही, तर गोरगरिबांनीही आपल्या पाल्यांना उच्चशिक्षण देऊन मुलांना स्वतःच्या पायावर उभे करून, विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आज साक्षरतेचा दिवा प्रत्येकाने घरोघरी लावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका गीता बोरकर यांनी केले. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित ‘स्कूल चले हम’ या अभियानांतर्गत मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने राबवलेल्या उपक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मॅजिक बस फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक वीरेंद्र देशमुख, प्रियांका रागीट, भुनेश्वरी दोनोडे, विभागप्रमुख प्रेरणा कंगाले, विलास कालेजवार यांच्यासह इयत्ता सहावी ते नववीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ‘स्कूल चले हम’ अभियानांतर्गत शाळेतून एक चांगला विद्यार्थी व उद्याच्या देशाचा आदर्श नागरिक बनावा, या उद्देशाने इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता अभियान राबवण्यात आले. अभियानातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तालुका व्यवस्थापक वीरेंद्र देशमुख यांनी या अभियानातून शाळाबाह्य मुले शोधमोहीम, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी पोस्टर, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरे, भिंती, झाडे, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर चिकटवून जनजागृतीतून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी प्रियांका रागीट यांनी ‘सुखसमृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा’, ‘एकेक अक्षर शिकू या, ज्ञानाचा डोंगर चढू या’ या घोषवाक्यांतून शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक शिक्षक विलास कॉलेजवर, प्रियांका कंगाले यांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रेरणा कंगाले यांनी केले, तर आभार विलास कालेजवार यांनी मानले.