शिक्षकाच्या मागणीसाठी : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन, सीईओंच्या निर्णयाकडे लक्षलाखांदूर : तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षकाचे पाहुणगाव येथील शाळेत अचानक बदली झाल्याचे कळताच, आधी त्या शिक्षकाची बदली थांबवा, म्हणून शेकडो पालकानी पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर धडक दिल्याची घटना आज घडली.तालुक्यातील अनेक जिल्हा परीषदेच्या शाळा विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु किन्हाळा येथील जिल्हा परीषद शाळेत एकही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने सन २०१५-१६ या सत्रात ही शाळा बंद करण्यात आली. या शाळेतील दोन शिक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात पुयार व पाहुणगाव येथील शाळेत पदस्थापणा करण्यात आली होती. परंतु शिक्षकांचे वेतन आॅनलाईन होत आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. पंचायत समितीच्या पत्रव्यवहाराच्या आधारे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ६ मार्च २०१६ ला आदेश निर्गमीत करुन पुयार येथील तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेले सहायक शिक्षक बि. व्ही. अलोणे यांची पाहुणगाव येथील शाळेत बदली करण्यात आली. सोबत सहायक शिक्षक डि. आर. पाणसे यांचीदेखील बदली पाहुणगाव येथील शाळेत करण्यात आली. सहायक शिक्षक अलोणे यांची बदलीचे आदेश पंचायत समितीच्या कार्यालयात पोहोचताच पुयार येथील शेकडो पालकांनी पंचायत समीतीचा शिक्षण विभाग गाठला. प्रभारी गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे याना निवेदन सादर करुन अलोणे या शिक्षकाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुयार येथे पदस्थापणा करा म्हणुन मागणी रेटुन धरली. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे मागण्या सादर करणार असल्याचे आश्वासन देताच राडा मागे घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नुतन कांबळे, कविता गेडाम, कविता भोयर, शैलेश रामटेके, वर्षा नाकतोडे, तेजराम दिवठे यांच्यासह शेकडो पालक उपस्थित होते. सीईओंच्या निर्णयाकडे पालकांचे लक्ष आहे. (तालुका प्रतीनीधी)
शिक्षण विभागावर पालकांचा राडा
By admin | Published: March 29, 2016 12:33 AM