राजेश डोंगरे यांचे प्रतिपादन : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभंडारा : सध्या शाळाबाह्य शिक्षण घेण्याची फॅशन झाली आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत गुणवत्ता आणि स्पर्धा यात पालक भरकटत आहे. दोन दशकापूर्वी शाळा व्यतिरिक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे शिक्षणात 'ढ' असा समज होता. आता सर्वत्र विद्यार्थ्यांना अवांतर शिक्षणाच्या फॅशनने झपाटले आहे. म्हणून पालकांनी सजग राहुन शाळा बाह्य शिक्षणातून होणारी लुट थांबवून शाळांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी केले.लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शैक्षणिक सत्र २०१५-१६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वीच्या वार्षिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी गुलाब बैस, जिल्हा परिषद सदस्य ज्योती खवास, माजी प्राचार्य परघी, प्रमोद मानापुरे, भारती लिमजे, अजय निखार, ममता गणवीर, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, जेष्ठ शिक्षक गायधने उपस्थित होते.यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यात बारावी परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम आलेल्या रक्षंदा कोलेकर, द्वितीय सोनल शहारे, तृतीय पियुष भोयर आणि इयत्ता दहावीतून प्रथम प्रियंका गायधने, द्वितीय जान्हवी भुरे व तृतीय सागर राठोड यांचा सत्कार करण्यात आला. १० वी व १२ वीच्या परीक्षेत विषयावार सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण घेणाऱ्या साक्षी गभने, तसनिया खान, श्रेया गजभिये, मराठी विषयात योजना बावणे, अमन गायधने, मयुर तिरपुडे, हिंदी विषयात सेजल धांडे, गणित विषयात दिग्वीजय निनावे, प्रशिल बडवाईक व विज्ञान विषयात आयुष देशभ्रतार व सुप्रिया गभने यांना सन्मानित करण्यात आले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेवून उच्चस्थ पदावर कार्यरत आणि व्यवसायात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आणि विविध व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला प्राप्त दाननिधीच्या पैशातून येणाऱ्या वार्षिक व्याजाच्या रकमेतून गत अनेक वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याची प्रथा सुरू आहे.प्राचार्य डी.व्ही. देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणातून शाळेचा इतिहास सांगितला आणि भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा असल्याचा उल्लेख केला. संचालन विणा सिंगनजुडे, बक्षिस वितरण समारंभाचे सुत्रसंचालन केशर बोकडे आणि आभार एन.जी. गायधने यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
शिक्षणासाठी पालकांनी सजग राहावे
By admin | Published: August 14, 2016 12:18 AM