निवडणूक तुमसर-मोहाडी कृउबा समितीची : खरी लढाई काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपातराजू बांते मोहाडी'राईस सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. कृउबा समितीवर कोणत्या पक्षाची सत्ता बसेल याविषयी चर्चा रंगत आहेत. पण, सहकार क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असताना यावेळी भाजपाला आपल्या प्रतिष्ठेसाठी लढावे लागणार आहे.विदर्भात सर्वांत मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर येथे आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर-मोहाडीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. २८ आॅगस्ट रोजी निवडणूक होत आहे. यावेळी कोटी रूपयाची उलाढाल होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंहासनावर कोण बसणार याची गणित मांडली जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. पक्षाचा चिन्ह नसला तरी या निवडणुकीत राजकीय सत्ता कोणत्या पक्षाकडे जाणार हे मात्र ठरलेलं असते. तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यामिळून संचालकपदाची निवडणूक होणार आहे. १९ संख्या असलेल्या संचालक मंडळाची कृषी उत्पन्न बाजार समिती २००९ पासून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्य हातात होती. विधानसभा निवडणुकीनंतर तुमसर-मोहाडी क्षेत्रात राजकीय समिकरणं बदलली आहेत. काँग्रेस पक्षाचे भाऊराव तुमसरे यांनी पक्षबदल केला. व्यवसायाचा व्याप सांभाळणारे भाऊराव तुमसरे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या दावनीला जुंपले गेले. भाऊराव तुमसरे भाजपात जाताच त्यांना एकधक्का त्याच्या पत्नीला पंचायत समितीच्या निवडणुकीत देण्यात आला. त्या डोंगरगाव पंचायत समिती क्षेत्रातून भाजपाच्या चिन्हावर लढल्या होत्या. भाऊराव तुमसरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने खूप काही दिले असताना ते राजकीय प्रवाहाच्या दिशेने वाहून गेले. आता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरी लढाई काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात होणार आहे. तथापि, यावेळी काँग्रेस-भाजपा असा समीकरण तयार झाल्याचे एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांने सांगितले आहे. काँग्रेसवाले म्हणतात, आम्ही भाजपासोबत एकत्र लढण्यासाठी दिलजमाई करणार असे म्हणण्यास जागा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकट्याच्या दमावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या हातात तुमसर नगरपालिका आहे तर तुमसर विधानसभा भाजपाच्या हातात आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सहकार क्षेत्र भाजपा की राष्ट्रवादीच्या हातात जाणार या विषयी चर्चा होत आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटात १४२१, सेवा सहकारी संस्था गटात १२९०, व्यापारी अडते गटात ६१७, हमाल मापारी गटात ४०६, पणन प्रक्रिया गटात ७५ असे ३८०९ मतदारांची संख्या आहे. दोन महिन्याच्या लांबणीवर ही निवडणुकीत होणार आहे. राजकीय समीकरण तयार करण्यासाठी खूप वेळ आहे. मात्र, हे खास भाजपाला सहकार क्षेत्रात किंबहूना तुमसर-मोहाडी बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध करू द्यायचे ही भाजपा विरोधी पक्षांनी / पॅनालनी तयारी केली आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तर काँग्रेस समर्थीत काही नेते राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याशी मित्रता साधून बिगर भाजपा सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आणण्यासाठी मनसूबा बनवित आहेत. पण, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होण्याची चर्चा आहे. कारण, कोटी रूपयांच्या घरात खेळणाऱ्या कृउबा समितीत संचालक म्हणून जाण्यासाठी नेते मंडळी उत्सूक झाली आहेत. स्वाभाविकपणे मतदारांची खरेदी - विक्री निश्चितच होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत पक्ष प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: June 24, 2016 1:23 AM