भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांतील पक्षश्रेष्ठींचा कस पणाला लागणार आहे. किंबहुना आतापासूनच आम्ही सर्वश्रेष्ठ उमेदवार कसे, याची साहेबांसमोर रंगीत तालीमही सुरू झाली आहे. प्रचाराला आठ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने सर्वच कामाला लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आकस्मिकपणे घोषित झालेल्या निवडणुकांमुळे अनेकांची हवी तेवढी तयारीही झाली नव्हती. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्याची वेळ उमेदवारांवर येऊन ठेपली आहे.
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. राजकारणातील पुढील सक्रियतेची ही पहिली जणू पायरीच असते. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर त्यानंतर अनेकजण आमदार व खासदार झाल्याचेही उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी सदर क्षेत्र व गण आपल्या किती प्रभावाखाली आहे, हे पटवून देण्याचे कार्य रविवारपासून सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच राजकीय पक्षही या निवडणुकीला गांभीर्याने घेत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करणे सुरू केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेनासह आदींचा समावेश आहे.
जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी
भाऊ, आपली सदर जिल्हा परिषद क्षेत्रात प्रचंड ओळख आहे. त्यामुळे अल्पावधीतच प्रचार कार्य आपण करू शकतो. म्हणजेच जेवढी ओळख तेवढा प्रचार कमी करून मताधिक्क्याने निवडून येऊ, असा विश्वास पक्ष श्रेष्ठींसमोर किंवा प्रभारींसमोर बोलून दाखविला जात आहे. एका एका क्षेत्रासाठी सहा ते सात उमेदवार मुलाखतीसाठी रांग लावत असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. यात ज्याचे जेवढे वजन तेवढीच आपली उमेदवारी पक्की असल्याचेही सांगून मोकळे होणारे उमेदवार दिसून येत आहेत.
शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची घोषणा
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदींसह अन्य पक्षांत उमेदवारांची चाचपणी करणे सुरू आहे. एका जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी पाच पेक्षा जास्त तर कुठे आठ ते नऊ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहात आहेत. कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. मात्र, नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणीच पक्षाची उमेदवारी मिळेल याची घोषणा शेवटच्या टप्प्यातच होईल, असे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे.
ग्रामीण वातावरण तापले
जिल्हा पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच ग्रामीण वातावरणही यातून सुटलेले नाही. चहाटपरी, चौपाल व अन्य सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांच्या तोंडी एकच चर्चा असते, ती म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची. अमक्या भागातून या उमेदवाराला उमेदवारी हमखास मिळणार, याची पैज लावण्याचेही प्रमाण दिसून येत आहे. सध्या ग्रामीणमधून मुख्यालय गाठून तिकिटांसंबंधी वशिलेबाजी करण्याचेही प्रमाण वाढले आहे.