दखल लोकमतची : लोकप्रतिनिधींची बँकेला भेट, खातेधारक समाधानीभंडारा : लाखनी येथील बँक आॅफ इंडिया शाखेत पासबुकचा तुटवडा असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित होताच लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. बँकेत नवीन पासबुकचा पुरवठा करण्यात आला असून त्या ग्राहकांना वितरित करण्यात आल्या आहेत. लाखनी येथील बँक आॅफ इंडिया शाखेत आठवडाभरापासून 'पासबुकचा'चा तुटवडा होता. त्यामुळे खातेधारकांना पायपीट करावी लागत होते. त्यामुळे ग्राहकांची बँकेत देवाण-घेवाण करण्यासाठी झुंबड उडत होती. बँकेत दोनच काऊंटर आहेत. कामगार, मजुरांची मजुरी बँकेतून होत असते. मजुरी काढण्यासाठी मजुरांना चढाओढ करावी लागली. खातेधारकांच्या पासबुकवर लिहिण्यापुरती जागा नाही, अशा ग्राहकांनी तेथे गत आठवडाभरापासून पासबुकची मागणी केली होती. ‘अजून आठवडाभर वाट पहा’, असा सल्ला तेथील एका महिला कर्मचाऱ्यानी दिला होता.पासबुकचा तुटवडा या शिर्षकाखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच बँकेच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली. भाजपचे राजेश बांते व परिसरातील लोकप्रतिनिधींनी बँकेत भेट देवून वरिष्ठ व्यवस्थापक मोहन बोरकर यांच्याशी चर्चा केली. बोरकर यांनी बँकेला नविन पासबुकचा पुरवठा झाला असून त्या ग्राहकांना वितरीत करण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले. अखेर ग्राहकांना पासबुक मिळाल्यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (नगर प्रतिनिधी)
अखेर 'पासबुक'चा तिढा सुटला
By admin | Published: February 04, 2017 12:26 AM