आॅनलाईन लोकमतभंडारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील जिल्ह्यातील ७९६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी केलेल्या या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने काही ठिकाणी अल्पावधीतच तर काही ठिकाणी महिनाभरात पुन्हा खड्डे पडतील, अशी स्थिती आहे. अनेक रस्त्यांवर सध्या खड्डेच खड्डे दिसत आहेत. खड्डेमुक्तीचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खुड्डेमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा करून खड्डे बुजवण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र, शनिवार पर्यत ९० टक्के खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे, असा दावा करीत बांधकाम विभागाने जिल्ह्यातील ७९६ किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केल्याचे सांगून त्यावर साडेचार ते साडेपाच कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख मार्ग, जिल्हा मार्ग, जिल्हा परिषदेचे रस्ते अशी विभागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एकूण १,२५३ किलोमिटर लांबीचे राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याची मोहीत सुरू केली जाते. ३१ डिसेंबर ही खड्डे बुजवण्याची मुदत राहते. मात्र रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकल्याने आणि टीका होऊ लागल्याने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र खड्डे भरण्याची ‘डेडलाईन’ संपली असताना भंडारा जिल्हा मात्र खड्डेमुक्त झालेला नाही.१९ नोव्हेंबर रोजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्याय भवनात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन १५ डिसेंबरपूर्वी खड्डे बुजविण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले होते. खड्डे बुजविणे व रस्ता बांधकाम यात जे अधिकारी चांगले काम करतील, अशा अधिकाºयांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ना.पाटिल यांच्या निर्देशाचे पालन करीत बांधकाम विभाग कामाला लागला होता. परंतु खड्डे पूर्णपणे बुजविण्यात बांधकाम विभागाला यश आले नाही.मार्गाच्या खड्डे दुरुस्तीचे काम अजुनही शिल्लक असून शहरातून जाणाºया जिल्हा परिषद चौक ते लाल बहाद्दूर शास्त्री चौक, खांबतलाव, जिल्हा सामान्य रूग्णालय, सहकारनगर ते पांढराबोडी दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असताना बांधकाम विभागाचे याकडे लक्ष गेले नाही, ही शोकांतिका आहे.भंडारा जिल्ह्यात १,२५३.२० किमी लांबीचे रस्ते आहेत. यातील ८२३.३४ किमी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी ७९६ किमी मार्गावरील खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली. उर्वरीत मार्गावरील खड्ड्याची कामे सुरु असून २५ डिसेंबरपर्यत पुर्ण होतील. खड्डे दुरुस्तीवरील नेमका खर्च आताच सांगता येणार नाही. खर्चाची माहिती सोमवारपर्यत सांगण्यात येईल.- ऋ. व. राऊत, कार्यकारी अभियंता (प्रभारी), बांधकाम विभाग, भंडारा.
खड्डेमुक्त नव्हे खड्डेमय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:36 PM
सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील जिल्ह्यातील ७९६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे.
ठळक मुद्देखड्डेमुक्तीचा उडाला फज्जा : ९० टक्के खड्डे बुजविल्याचा बांधकाम विभागाचा दावा