लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांचा दररोज नवीन उच्चांक होत असून शुक्रवारी तब्बल ७९३ नव्या रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गापासून आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून शुक्रवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३७५५ वर पोहोचली असून कोरोनाचे ३४७ बळी झाले आहेत. दररोज रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूरनंतर विदर्भात भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महिनाभरापूर्वी विदर्भात सर्वाधिक कमी रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळत होते. मात्र गत १५ दिवसांपासून हळूहळू रुग्णांची संख्या वाढायला लागली. ३१ मार्च रोजी ५६६ रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी १ एप्रिल रोजी तब्बल ७३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर शुक्रवारी कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक गाठत ७९३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. दररोज चढत्या क्रमाने रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांत खळबळ उडाली आहे.शुक्रवारी ५६३७ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ३९२, मोहाडी ८९, तुमसर १३०, पवनी ९२, लाखनी ३७, साकोली ३४, लाखांदूर २९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ८९ हजार १३४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १९ हजार १७१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. त्यापैकी १५ हजार ६९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ३७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी भंडारा तालुक्यातील ५९ वर्षीय आणि तुमसर तालुक्यातील ८२ वर्षीय पुरुषासह पवनी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. दोन पुरुषांचा मृत्यू भंडाराच्या खासगी रुग्णालयात तर पवनी येथील महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील विविध भागात कंटेन्टमेंट झोन तयार करण्यात येत आहे. यासोबतच लगतच्या ग्रामपंचायतीमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे.
मांढळ येथे आढळले २७ रुग्ण
तुमसर : तालुक्यातील मांढळ येथे एकाच दिवशी २७ रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गावात अनोळखी व्यक्ती आणि चारचाकी वाहनाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. २७ जणांमध्ये तीन लहान मुले, एका शिक्षिकेचा समावेश आहे. गावच्या वेशीवर लाकडी कठडे लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सुरूवातीला शहरी भागात अधिक होती. मात्र आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. लाखनी तालुक्यात किन्ही येथे २१ रुग्ण आढळल्यानंतर आता मांढळ येथे २७ रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याचे सिद्ध होत आहे.
ॲक्टिव्ह रुग्ण वाढलेभंडारा जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० पर्यंत खाली आली होती. मात्र आता ही रुग्णसंख्या ३७५५ वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात १७५९, मोहाडी २८१, तुमसर ४९१, पवनी ५८०, लाखनी ३६२, साकोली १८२ आणि लाखांदूर तालुक्यातील शंभर रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह रुग्ण वाढत असून काही जणांवर रुग्णालयात तर काही व्यक्ती गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.