लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के तर पाॅझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के होता. प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, अनलाॅक प्रक्रियेने सूट मिळाल्याने नागरिकांची बाजारात होणारी गर्दी धोकादायक ठरू शकते.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत येऊ लागली. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले. दररोज ७० ते ८० व्यक्ती कोरोनामुक्त होत आहेत. शनिवारी जिल्ह्यात ९७० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा २, तुमसर ३, पवनी १, लाखनी ६, साकोली २ आणि लाखांदूर तालुक्यात ३ असे १७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २३७ व्यक्ती पाॅझिटिव्ह झाले होते. त्यापैकी ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. गत दहा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात आता कोरोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुका २४ हजार १२७, मोहाडी ४२३६, तुमसर ६९७४, पवनी ५८८५, लाखनी ६४१२, साकोली ७४०५ आणि लाखांदूर तालुक्यात २८५१ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गत आठवड्यात अनलाॅक प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील बाजारपेठ सुरु झाली आहे. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु असते. परंतु बाजारपेठेतील गर्दी बघितल्यानंतर कोरोना संपला की काय अशी शंका येते. कोरोना संसर्गाचे नियम पायदळी तुडवत प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. नगरपरिषदेचे पथक सूचना देऊनही कुणी ऐकत नाही.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२८ - जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. गावागावात रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. गत आठवड्यात हजाराच्या आसपास असलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३२८ वर आली आहे. भंडारा तालुक्यात ६४, मोहाडी २०, तुमसर २३, पवनी २०, लाखनी २८, साकोली १५०, लाखांदूर २३ असे ३२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनाने बळी नाही- एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्यात जून महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. गत १२ दिवसात केवळ एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. गत आठवडाभरात तर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०५५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.७८ टक्के आहे.