लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यावर पोहोचले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही कमी येत असून, पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ ६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.भंडारा जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ५९ हजार ३५४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. दररोज सरासरी १,२००च्या आसपास पाॅझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरू होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. यामुळे समाजमन भयभीत झाले होते. अशा स्थितीत मे महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यायला लागली. जून महिन्यात तर मोठा दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या सिंगल डिजिटमध्ये यायला लागली, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.२१ टक्के आहे. मृत्युदर १.७८ टक्के आणि पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत असल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त- जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार १७९, मोहाडी ४,२५३, तुमसर ६,९९२, पवनी ५,९००, लाखनी ६,४३२, साकोली ७,५५० आणि लाखांदूर तालुक्यात २,८६७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा ३६, मोहाडी १३, तुमसर ८, पवनी ९, लाखनी १८, साकोली ३१, लाखांदूर ११ रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ हजाराच्या आसपास गेली होती. त्यावेळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.
२० दिवसांत एक मृत्यू- एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या जिल्ह्याला जून महिन्यात मोठा दिलासा मिळाला. ४ जून रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला. गत २० दिवसांत केवळ एकाच मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. त्यात भंडारा ४९२, मोहाडी ९५, तुमसर ११९, पवनी १०४, लाखनी ९५, साकोली १०१, लाखांदूर ४९ रुग्णांचा समावेश आहे.