लाखांदुर : रात्रीच्या सुमारास घरासमोरील अंगणात विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. सर्पमित्राच्या सहाय्याने सदर सापाला जंगलात जिवंत सोडून जीवदान दिल्याची घटना घडली. सदरची घटना तालुक्यातील सरांडी बु येथे ५ मे रोजी रात्री १२ वाजतादरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील सरांडी बु येथील प्राथमीक आरोग्य उपकेंद्राच्या मागील बाजूला असलेल्या वस्तीत भागवत कुथे नामक इसमाच्या अंगणात रात्री दरम्यान साप आढळून आला. घटनेच्या दिवशी रात्री दरम्यान घरातील मंडळी अंगणात गप्पागोष्टी करत असताना अंगणात चमकणारी वस्तू दिसून आली. त्यावरून त्यांनी जवळ जाऊन बघितले असता तो असल्याचे निदर्शनास आले.
त्यावरुन संबंधितांनी गावातीलच सर्पमित्राला पाचारण करत वनविभागाला माहिती दिली. सदर सापाला पाहण्याकरीता गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सदर माहितीवरून गावातील सर्पमित्र जागेश्वर कांबळे व आकाश तिघरे घटनास्थळी पोहोचून सापाला पकडले व पुढील दिवशी वनविभागाच्या मार्गदर्शनात सदर सापाला दांडेगाव येथील जंगलात जिवंत सोडण्यात आले.
पट्टेरी मण्यार हा साप भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या ४ जिल्ह्यांत आढळून येत असून सदरचा साप नागापेक्षा १६ विषारी असून रात्रीदरम्यानच दिसून येत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. सदरचा पट्टेरी मन्यार साप तालुक्यात यंदा तीन ठिकाणी पकडण्यात आला असून तीनदाही जीवदान दिल्याची माहिती आहे. मागील आठवड्यात सरांडी बु. येथीलच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नाग साप निघाला होता.