१० लोक ०५ के
भंडारा : तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी तालुकास्तरीय सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असूनही त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक शिक्षक वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र असूनही केवळ प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सकारात्मक चर्चा केली. त्यात प्रशिक्षण प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत सत्र २००७ ते २०१० या कालावधीत तालुकास्तरावर शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले होते. यात तालुक्यातील अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले, मात्र बहुतांश शिक्षकांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्राअभावी शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे विदर्भ माध्य. शिक्षक संघ व खासगी प्राथ. संघाच्या शिष्टमंडळाने ९ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांंची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. यावेळी तालुक्यातील सर्व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी प्रत्यक्ष घेतलेल्या प्रशिक्षणाच्या तारखेनिहाय नोंदी प्रमाणित करून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्याचे मान्य करण्यात आले.
तसेच मुख्याध्यापकांच्या प्रमाणित नोंदीनुसार शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणित करण्यात येईल. असे गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी संघटनेला आश्वासन दिले. खासगी शाळांतील सर्व मुख्याध्यापकांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे दिनांक व कालावधी प्रमाणित करण्याचे आव्हान विमाशिचे कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, प्राथमिकचे कार्यवाह विलास खोब्रागडे यांनी केले आहे. यावेळी धनवीर काणेकर, प्रेमलाल मलेवर, अनिल कापटे, धीरज बांते, अनंत जायभाये, बेनिलाल चौधरी, प्रीती लांजेवार आदी उपस्थित होते.