पवनी : बजरंग दलाचे संयोजक तिलक वैद्य व त्याच्या मित्राला चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चमूने मारहाण केली. या घटनेतील पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीकरिता बजरंग दल व शहर भाजपातर्फे आज पवनी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदचा पूर्णत: फज्जा उडाला. व्यापारी संघाने या बंदला विरोध केला होता. काल बुधवारी तिलक वैद्य व त्याचा मित्र मंगेश पडोळे हे काल ११ वाजताच्या सुमारास त्याच्या वाहनाने खैरी दिवाण - सेंद्री मार्गाने जात असताना चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने त्यांची अडवणूक केली तसेच त्यांना वाहनात कोंबून मारहाण केली. या दोघांना घेऊन ब्रम्हपुरीकडे जात असताना हे वाहन काही लोकांनी अडवून उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. दोघांनी कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला. या घटनेमुळे बजरंग दलाचे व भाजपा पदाधिकारी पवनी पोलीस ठाण्यामध्ये आले. उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. बजरंग दल व भाजप कार्यकर्त्यांनी सदर कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच या मागणीच्या पूर्ततेसाठी पवनी बंदची हाक दिली. शहरातील व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच बैठक घेऊन बंदला समर्थन न देण्याचा निर्णय घेतला. या बाबतची सूचनाही पवनी पोलीस ठाण्यात देण्यात आली. तसेच वेळ प्रसंगी संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली. परिणामी पवनी शहरातील सर्व दुकाने नियमितपणे सुरु होती. काही शाळा सकाळपाळीत बंद करण्यात आल्या. दुसरीकडे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याशी काल पवनी पोलीस ठाण्यामध्ये चर्चा केली असता काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी पोलीस ठाणे अंतर्गत दारुची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले होते. त्यातील साहित्य हे पवनीतील असल्याचे आढळून आले. प्रकरणाच्या चौकशीकरिता या दोघांना नेण्यात येत होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)
पवनी बंदचा फज्जा
By admin | Published: February 10, 2017 12:25 AM