तहसीलदारांना निवेदन : रजा आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा पवनी/कोंढा : महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी महासंघातर्फे आज तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठ्यानी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत मागण्याचे निवेदन देण्यात आले.तलाठी साजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे याबाबत तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय बांधून देणे, मंडळाधिकारी यांना कार्यालयीन भाडे मंजूर करणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी २५ टक्के पदे कर्मचाऱ्यासाठी राखून ठेवणे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशा मागण्या आहेत. ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफारमध्ये तलाठी व मंडळाधिकारी यांना अडचणी येत असून सर्वरला स्पीड नाही. त्यामुळे दिवसाला ई-फेरफारची नोंद होत नाही. सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आहेत. एडिट मॉड्युल सुटसुटीत करण्यात यावे, डेटाकार्डसाठी ७५० रूपये शासनाने अद्याप दिले नाही. शासनाने निधी उपलब्ध करूनही तहसिलदार पैसे वाटप करीत नाही. शासनाने लॅपटॉप व प्रिंटर अजुनपर्यंत पुरवठा केलेला नाही, अशा अनेक अडचणी आहेत. ७/१२ संगणकीकरणामुळे व ई-फेरफारमुळे प्रकरणाचा निपटारा होत नाही. त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. अवैध गौण खनिज थांबविण्यासाठी मंडळाधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्याचा व जप्तीचे अधिकार नसल्यामुळे या प्रकरणात गुन्हेगारी प्रकरणे रखडत आहेत. तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर हल्ले होत आहेत. या मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा मागण्याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यासाठीचे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे.या धरणे आंदोलनानंतर मागण्या मान्य न झाल्यास १० रोजी अतिरिक्त साजाचा कार्यभार तहसीलदारांना परत करण्यात येणार असून १६ नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल, असे उपविभागीय अध्यक्ष सिराज खान, सचिव शैलेश उपासे यांनी सांगितले. या आंदोलनात सिराज खान, शैलेस उपासे, जगदीश कुंभारे, संदेश इंगळे, राजेश मडामे, आरती पोतदार, शुभांगी बुरडकर, अतुल वऱ्हाडे, अनंत मानकर, राजेश कुरकुरे, राजकुमार बांबोर्डे, संदीप मोटघरे यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
पवनीत धरणे आंदोलन
By admin | Published: November 08, 2016 12:29 AM