भाजपचा सफाया : निवडणूक बाजार समितीचीपवनी : पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनेलचे १९ पैकी ११ सदस्य विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित सहकार पॅनेलचे सात संचालक निवडून आले तर भाजपा - शिवसेना समर्थित परिवर्तन पॅनेलचा पुरता सफाया झाला आहे. शेतकरी विकास पॅनेलचे सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण जागेकरीता होमेश वैद्य, डॉ.किशोर मोटघरे, कुंडलीक काटेखाये, राजेश मेंगरे, हंसराज गजभिये, महिला गटातून सुधा ईखार, मागासवर्गीय गटातून शंकर फुंडे, विमुक्त भटक्या जमाती गटातून गोविंदा चाचेरे, ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून चेतक डोंगरे, व्यापारी अडतीया गटातून तोमेश्वर पंचभाई, तोलाई हमाल गटातून सोमेश्वर बावनकर हे ११ संचालक निवडून आले.सहकार पॅनेलचे सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण जागेकरीता अशोक मोहरकर, गोपाल सावरबांधे, महिला गटातून नीला पाथोडे, ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण जागेकरीता करीता अनिल बावनकर, माणिक ब्राम्हणकर, आर्थिक दुर्बल गटातून शारदा वाघ, व्यापारी अडतीया गटातून तुलाराम पंचभाई हे ७ संचालक निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास देशपांडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अनुप भांडारकर यांनी काम पाहिले. निकाल घोषित झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनेलतर्फे विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)आघाडीची विजयाची मालिकाभंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर विजयाची घोडदौड सुरूच आहे. पवनी कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मिळवून भाजपला चित केले आहे. पवनी ज्या मतदारसंघात येते त्या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व भाजपकडे असताना बाजार समितीमध्ये एकही जागा त्यांच्या वाट्याला आलेली नाही. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. या विजयाचे शिल्पकार दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये आणि राजेश डोंगरे ठरले आहेत. जिल्ह्यातील जनतेने प्रफुल पटेल यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन मत दिल्याची प्रतिक्रिया राजेश डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पवनीत राष्ट्रवादीची मुसंडी
By admin | Published: September 08, 2015 12:28 AM