पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूरज वाणी यांच्या रूपाने मिळाले. त्यांच्या दोन महिन्याच्या पालांदूर येथील वैद्यकीय सेवेत त्यांची रुग्णालयातील शिस्तबद्धता, तळमळ वाखाणण्याजोगी अनुभवण्यात आली. ही तळमळ व शिस्तबद्धता कायमस्वरूपी टिकावी याकरिता रिक्त पदांचा असलेला वानवा दूर व्हावा, या हेतूने दामाजी खंडाईत यांनी चर्चा केली.
खासगीतील आरोग्यव्यवस्था खूप महागडी झालेली आहे. महागडी आरोग्यव्यवस्था जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने निर्धारित केलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सुदृढ राहावी. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ असणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास केला असता, आरोग्य व्यवस्था ही सलाईनवरच दिसत आहे. या विस्कटलेल्या सुस्त आरोग्य व्यवस्थेला चेतना देण्याची नितांत गरज आहे. पालांदूर येथे तालुक्यानंतर मोठे गाव म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाला इमारत व सदनिकासुद्धा आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत भव्य आहे. मात्र आरंभापासूनच मंजूर पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. अपुऱ्या व्यवस्थेमुळे सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या कामावर ताण येतो. अपेक्षित सेवा वेळेत रुग्णांना मिळत नाही. अशावेळी कठीण प्रसंगी रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे शासनाचा खरा हेतू सिद्ध होत नाही. गत पाच वर्षापासून पदांची उणीव कायम आहे. ती भरून काढावी. जेणेकरून कामाचा व्याप एकमेकावर न फेकता आरोग्य व्यवस्था सुरळीत व्हावी, अशी मागणी आहे.
चौकट
रुग्ण कल्याण समिती कार्यान्वित राहावी. दर महिन्याला त्यांची बैठक व्हावी. त्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हटकून बैठकीला हजर असावे. आलेल्या समस्यांचे निराकरण करून जनसामान्यांना आधार द्यावा. या समितीत असणारे सर्व पदाधिकारी कार्यतत्पर असावेत. बऱ्याच दिवसापासून ही समिती कार्यतत्पर नसल्याचे आढळले. यामुळेसुद्धा रुग्णसेवा विस्कटलेली आहे.
काेट
ग्रामीण रुग्णालय पालांदूरला उपलब्ध असलेल्या सेवा सुविधेत नियमित आरोग्य सुविधा पुरविली जात आहे. दररोज येथे सुमारे १०० पर्यंत बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. रिक्त जागेत एक वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारिका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक प्रयोगशाळा सहायक, एक शिपाई पद रिक्त आहेत. याबाबत वरिष्ठांना कळविलेले आहे.
डॉ. सूरज वाणी
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पालांदूर.